“काल रात्री मला फोन आला अन् सांगितलं तुम्हाला भाजपात प्रवेश घ्यायचा आहे, मी म्हणालो...”
By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 01:41 PM2021-01-14T13:41:56+5:302021-01-14T13:45:01+5:30
केंद्रात ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा अरविंद शर्मा यांनाही पीएमओ कार्यालयात आले. सध्याच्या घडीला केंद्रीय लघु व अवजड उद्योग खात्यात ते सचिव पदावर कार्यरत होते.
नवी दिल्ली – गुजरात कॅडरचे माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद कुमार शर्मा यांनी लखनौ येथे भाजपात प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात राहणाऱ्या अरविंद कुमार शर्मा हे २०२२ मध्ये निवृत्त होणार होते. परंतु अचानक स्वैच्छानिवृत्ती घेण्याचा त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांपैकी एक होते, भाजपा त्यांना विधान परिषदेवर पाठवू शकतं असं बोललं जात आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर एके शर्मा म्हणाले की, मी मऊ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात राहतो, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी सांभाळेन, काल रात्री मला फोन आला, तुम्हाला भाजपाचं सदस्य बनवायचं आहे असं त्यांनी सांगितले. मीदेखील त्यासाठी होकार कळवला. अरविंद कुमार शर्मा १९८८ च्या गुजरात कॅडरमधील अधिकारी आहेत. त्यांनी २००१ ते २०१३ पर्यंत गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध पदांवर काम केले होते, केंद्रात ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हा अरविंद शर्मा यांनाही पीएमओ कार्यालयात आले. सध्याच्या घडीला केंद्रीय लघु व अवजड उद्योग खात्यात ते सचिव पदावर कार्यरत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय विश्वसनीय अधिकाऱ्यांच्या यादीत अरविंद कुमार शर्मा यांचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील मुहम्मदाबाद तहसिलच्या काझाखुर्द गावात ते राहतात. शर्मा यांचा जन्म ११ एप्रिल १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवमूर्ती राय आणि आईचं नाव शांती देवी आहे. एके शर्मा यांनी प्राथमिक शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मऊच्या डीएवी इंटर कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
Former IAS officer AK Sharma joins BJP in Lucknow. pic.twitter.com/IrPgSmRawR
— ANI UP (@ANINewsUP) January 14, 2021
अरविंद शर्मा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून प्रथम पदवी संपादन केली आणि नंतर राजकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९८८ मध्ये गुजरात कॅडरच्या आयएएस सेवेसाठी त्यांची नियुक्ती झाली, एके शर्मा सुरूवातीला एसडीएम होते त्यानंतर १९८९ मध्ये डीएम बनले, १९९५ मध्ये मेहसाणा आयुक्तपदी निवड झाली, गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात सचिव पदाची जबाबदारी मिळाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भरवसा जिंकण्यात एके शर्मा यशस्वी झाले.
अरविंद शर्मा यांना २०१३ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त प्रमुख सचिव पदी पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये दिल्लीत सत्ता आल्यानंतर जून २०१४ मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर एके शर्मा यांना पंतप्रधान कार्यालयात सहसचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून ते पीएमओ कार्यालयात आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतेवेळी त्यांच्याकडे पीएमओचं अतिरिक्त सचिव पद होते. निवृत्ती घेतल्यानंतर अरविंद कुमार गुरुवारी लखनौ येथे पोहचले आणि दुपारी भाजपात प्रवेश केला. एके शर्मा यांना भाजपा विधान परिषदेवर पाठवू शकते, उत्तर प्रदेशातील राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाईल, कारण पीएमओ कार्यालयात त्यांची पकड मजबूत आहे. योगी मंत्रिमंडळातही शर्मा विशेष जबाबदारी स्वीकारू शकतात.