सरकारचे चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे - मुख्यमंत्री ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 04:07 AM2020-12-04T04:07:09+5:302020-12-04T04:07:19+5:30
सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई : माझ्या सरकारला तीन चाके आहेत अशी टीका केली गेली, मात्र चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे होते, हे विरोधकांना दिसलेच नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही व घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.
सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी ठामपणे हे सरकार चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सरकारला कसलाही धोका नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे सरकार पाडण्यासाठी अनेक आमिषे दिली गेली मात्र हे सरकार पडले नाही आणि पडणारही नाही. अनेक अडचणी आल्या, मात्र आपण त्यातून मार्ग काढला, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा करणारा एकही निर्णय वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने घेतला नाही, असे सांगून अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, त्यांनी ती तातडीने जाहीर करावी अशी विनंती करतो असे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून, चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचं काम केलं आहे. यावेळी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बनवलेल्या ''महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही'' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी प्रास्ताविक केले.
सरकारला धोका नाही
सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी ठामपणे हे सरकार चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सरकारला कसलाही धोका नाही. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.