मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ :पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 08:02 PM2021-02-19T20:02:50+5:302021-02-19T20:06:42+5:30
Prithviraj Chavan Satara-केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा : केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला आघाडीच्या धनश्री महाडिक, युवकचे अध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदींची उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळेच इंधन, गॅस यांची भाववाढ झालेली आहे. कोरोनातील लसीकरण, किसान सन्मान योजना, गॅसचे मोफत वाटप या योजना राबविण्यात आल्याचे मोदी सांगत असले तरी सरकारच्या तिजोरीतून वाटलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे मोदींनी लोकांच्या खिशातून काढून घेतले आहेत. इंधन दरवाढ करुन लोकांवर बोजा टाकण्यात आलेला आहे. पाकिस्तानात ५१ रुपयांना पेट्रोल मिळते. आपल्याकडे मात्र आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी इंधनावर भरमसाट कर लादण्यात आलेला आहे, तो मोदींनी पहिल्यांदा कमी करण्याचा निर्णय घ्यावा.
दरम्यान, इंधनदरवाढ ही मागील सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे, याबाबत विचारले असता, ह्यआम्ही त्याबाबत खुली चर्चा करायला तयार आहोत. देशात ८५ टक्के तेल आयात केलं जातं. काँगे्रसने जे केलं ते खुलेपणाने आम्ही मांडलेलं आहे, असे स्पष्टीकरण आ. चव्हाण यांनी केले.
तेलाचे किती साठले शोधले ते सांगा...!
काँग्रेस सत्तेवर असताना देशांतर्गत इंधनाचे साठे शोधून काढण्यात आले. बॉम्बे हाय हे त्याचे उदाहरण आहे. आपल्या देशात ८५ टक्के तेल आयात करावे लागतं, अशा परिस्थितीत केंद्रातील सत्तेच्या सहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने देशांतर्गत तेलाचे किती साठे शोधून काढले, ते त्यांनी स्पष्ट करावं, असे आव्हान देखील आ. चव्हाण यांनी दिले.