नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:41 PM2024-10-22T13:41:54+5:302024-10-22T13:45:01+5:30

Sandeep Naik Latest News: बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपाकडे करण्यात आली होती. पण, भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्याने संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Ganesh Naik Son Sandeep Naik joined Sharad Pawar's NCP, he will candidate against manda Mhatre from Belapur vidhan sabha | नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

Sandeep Naik Joins Sharad Pawar's NCP: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपाला नवी मुंबईत पहिला धक्का बसला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तयारी करत असलेल्या पण, तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपाला रामराम केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थिती संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. 

माजी मंत्री आणि ऐरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, संदीप नाईक यांना मात देत मंदा म्हात्रे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळण्यात यश मिळवले. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 

संदीप नाईक यांच्यासह २५ माजी नगरसेवक आणि भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

संदीप नाईक यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी सुप्रिया सुळेंचीही भेट घेतली होती. पण, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वेच अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. त्याचवेळी संदीप नाईकांना भाजपाने उमेदवारी दिली नाही, तर ते शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. 

२०१९ मध्ये का सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना संदीप नाईक म्हणाले, "२०१९ मध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि निर्णय आम्हाला घ्यावा लागला. तो निर्णय नवी मुंबईच्या विकासासाठी होता. नवी मुंबईचे दीर्घ प्रलंबित विषय सत्तेत असल्याशिवाय होत नाही म्हणून तो निर्णय घ्यावा लागला. पण, आम्हाला दिलेला शब्द निवडणुका घोषित झाल्यानंतर फिरवला गेला. माझी काही अंशी कोंडी झाली. तरीही कार्यकर्त्यांची, शहराची कोंडी होऊ नये म्हणून मी थांबलो."

मंदा म्हात्रेंवर संदीप नाईकांनी साधला निशाणा!

"२०१९ मध्ये त्या पक्षाने (भाजपा) आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली. दोन्ही मतदारसंघात यश मिळालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, हे यश कुणाचं नाहीये. हे यश तुमचं (नाईक गट) तर नक्कीच नाहीये, हे यश पक्षाचं पण नाहीये, हे यश माझं (मंदा म्हात्रे) आहे. हे ऐकून कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आम्हाला अपमानित केलं गेलं. तो अपमान माझ्यासहित कार्यकर्त्यांनी सहन केला", असे म्हणत संदीप नाईकांनी मंदा म्हात्रेंवर नाव न घेता निशाणा साधला. 
  
2019 मध्ये काय घडलं होतं?

गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश करतानाच संदीप नाईकांना बेलापुरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पण, भाजपाने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. मंदा म्हात्रे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८७ हजार ८५८ मते मिळाली होती. तर एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांना ४४ हजार २६१ मते मिळाली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे यांना २७ हजार ६१८ मते मिळाली होती. मंदा म्हात्रे यांनी ४३ हजार ५९७ मताधिक्याने विजय मिळवला होता.

Web Title: Ganesh Naik Son Sandeep Naik joined Sharad Pawar's NCP, he will candidate against manda Mhatre from Belapur vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.