पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 06:08 AM2021-01-24T06:08:45+5:302021-01-24T06:09:21+5:30
शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे लाेकार्पण
मुंबई : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे आपल्या देशाचे मोठे नेते व मार्गदर्शक होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांच्या कारकीर्दीत अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे ऋणानुबंध होते. सर्वपक्षीय दिग्गज नेते पक्षीय उंबरठे ओलांडून एकत्र आले आहेत, हा माझ्या आयुष्यात अविस्मरणीय दिवस आहे. यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कुलाबा येथील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला सर्वपक्षीय दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे राजकारणातील दुर्मिळ चित्र यानिमित्ताने दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोनशिलेचे लोकार्पण केले.
या नेत्यांची उपस्थिती
कार्यक्रमाला विधानसभेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री असलम शेख आदी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला.
पुतळा साकारणाऱ्या शशी वडके यांचा सत्कार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हुबेहुब साकारणारे शिल्पकार शशी वडके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वास्तुविशारद रोहन चव्हाण यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते, सल्लागार भूपन रामनाथकर यांचा शरद पवार यांच्याहस्ते, तर अभियंता प्रदीप ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, भगवे झेंडे आणि शिवसैनिकांच्या गर्दीने हा परिसर भगवामय झाला होता. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि १२०० किलो ब्रॉन्झ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.