गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:16 PM2024-10-19T22:16:45+5:302024-10-19T22:28:56+5:30
Shrikant Pangarkar Shiv Sena: पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकर याने जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Shrikant Pangarkar: २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत पांगारकरने प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत आणि ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे", माजी मंत्री आणि शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जून खोतकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
गौरी लंकेश हत्या प्रकरण : श्रीकांत पांगारकरची भूमिका काय?
५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली. या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळेची एसआयटीने चौकशी केली. त्यात महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगितल्याचे त्याने सांगितले.
तपासातून समोर आले की, गौरी लंकेश यांची हत्या होण्यापूर्वी आणि नंतर श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता. या प्रकरणात पांगारकरला अटक करण्यात आली. २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. यावर्षी ४ सप्टेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने पांगारकरला जामीन मंजूर केला.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही श्रीकांत पांगारकरचा सहभाग होता. याचवर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पांगारकर आणि इतर चार सहआरोपींना जामीन मंजूर केला होता. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलवर हल्ला करण्याचा कट आणि त्यासाठी शस्त्रसाठा केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
श्रीकांत पांगारकर माजी नगरसेवक
आरोपी श्रीकांत पांगारकर जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवकही राहिलेला आहे. २००१ ते २००६ या काळात तो नगरसेवक होता.