पाकला दम दिला म्हणून अभिनंदनला सोडले; नरेंद्र मोदी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 04:06 AM2019-04-22T04:06:46+5:302019-04-22T04:07:17+5:30

'योग्य वेळी सर्व काही उघड करीन'

Gave congratulations as a coward; Narendra Modi's claim | पाकला दम दिला म्हणून अभिनंदनला सोडले; नरेंद्र मोदी यांचा दावा

पाकला दम दिला म्हणून अभिनंदनला सोडले; नरेंद्र मोदी यांचा दावा

Next

पाटण (गुजरात) : आपण पाकिस्तानला गंभीर परिणाम होतील असा दम दिला म्हणून बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हाती लागलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकास त्या देशाने लगेच सहीसलामत सोडले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला.

बालाकोट हवाई हल्यानंतर भारत व पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये धुमश्चक्री झाली होती. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले होते. परंतु त्यांच्याही विमानावर हल्ला झाल्याने त्यांनी पॅराशूटने बाहेर उडी घेतली. पण ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. दोन दिवसांनी पाकिस्तानने त्यांना सोडून दिले होते.

येथील प्रचारसभेत त्या घटक्रमाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, आम्ही पत्रकार परिषद घेतली व आमच्या वैमानिकाचे काही बरेवाईट झाले तर, मोदींनी पाहा आमची काय अवस्था केली, असे जगाला सांगत फिरण्याची तुमच्यावर वेळ येईल, असा सज्जड इशारा आम्ही पाकिस्तानला दिला. मोदी पुढे म्हणाले की, मोदींनी १२ क्षेपणास्त्रे तयार ठेवली आहेत व ते कदाचित हल्ला करतील व परिस्थिती आणखी चिघळेल, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने दुसºया दिवशी म्हटले होते. त्याच दिवशी पाकिस्तानने आमच्या वैमानिकाची सुटका करण्याचे जाहीर केले, अन्यथा त्यावेळी ‘कत्ल की रात’ झाली असती.

हे सर्व अमेरिकेचे म्हणणे होते. मला आत्ता त्याविषयी काहीही बोलायचे नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी सर्व बोलेन, असेही मोदी म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षेशी आम्ही कधीही तडजोड केली नाही व करणारही नाही, असे सांगत पंतप्रधान असेही म्हणाले की, पंतप्रधानपदाची खुर्ची राहो अथवा जावो, पण एक तर मी तरी जिवंत राहीन किंवा दहशतवादी तरी जिवंत राहतील, हा माझा ठाम निर्धार आहे.

गुजरातमधील २६ जागांवर मंगळवारी मतदान व्हायचे आहे. गुजरात हे माझे राज्य असल्याने येथील भूमीपुत्राला सर्व जागा मिळवून देणे हे गुजरातच्या मतदारांचे कर्तव्य आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, माझे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे नक्की. पण गुजरातने भाजपला २६ जागा दिल्या नाहीत तर निकालानंतर लगेच टीव्ही वाहिन्यांवर त्याची चर्चा रंगेल. (वृत्तसंस्था)

शरद पवारांना चिमटा
पूर्वी ज्यांना मोदींनी आपले राजकीय गुरू म्हटले, त्या शरद पवारांनी ‘मोदी यापुढे काय करतील याची मला भीती वाटते,’ असे वक्तव्य शनिवारी केले होते. त्यावर पवारांना चिमटा घेत मोदी म्हणाले की, उद्या मोदी काय करणार याची जर पवारांनाही कल्पना नसेल, तर इम्रान खानला तरी ते कसे कळणार?

Web Title: Gave congratulations as a coward; Narendra Modi's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.