'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:37 PM2021-03-22T16:37:51+5:302021-03-22T16:39:19+5:30
Girish Bapat criticized on Sharad Pawar : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना टोला लगावत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे.
परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून टाकली आहे. यावरून आता भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना टोला लगावत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Girish Bapat criticized on Sharad Pawar; said, is not a judge to give a clean chit)
एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणे, हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे, कुंपणच शेत खायला निघाले आहे अशी परिस्थिती आहे. अनिल देशमुख यांच्या सर्व क्लिप आल्यावर सगळं सत्य पुढे येईल, असे गिरीश बापट म्हणाले. तसेच, शरद पवार हे क्लीनचिट द्यायला न्यायाधीश नाहीत. ते काँग्रेसला लिंबू टिंबू समजतात. काँग्रेसला गृहीत धरले जात नाही, याची किंमत काँग्रेसला येत्या काळात चुकवावी लागेल. शरद पवार नेहमीच सरकार खंबीर असल्याचे सांगतात, मात्र ते या प्रकरणातून कळतंय किती खंबीर आहेत, असा टोलाही गिरीश बापट यांनी यावेळी शरद पवारांना लगावला आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले शरद पवार?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी यावेळी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली.
"अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झाले आहे", असे शरद पवार म्हणाले.
वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटी
अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाइन होते. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचे दिसून येत आहे, असे शरद पवार म्हणाले.
अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा - अतुल भातखळकर
या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी याविरोधात समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.