VIDEO- गिरीश महाजनांच्या मेळाव्यात का झाला 'राडा'?; जाणून घ्या संपूर्ण राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 07:44 PM2019-04-10T19:44:19+5:302019-04-10T20:01:28+5:30

अमळनेर येथील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

girish mahajan assaulted bjp shiv sena gathering amalne, Know entire politics | VIDEO- गिरीश महाजनांच्या मेळाव्यात का झाला 'राडा'?; जाणून घ्या संपूर्ण राजकारण

VIDEO- गिरीश महाजनांच्या मेळाव्यात का झाला 'राडा'?; जाणून घ्या संपूर्ण राजकारण

Next

जळगावः अमळनेर येथील सेना-भाजपाच्या मेळाव्यामध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली, त्याच वेळी गिरीश महाजनांना धक्काबुक्की झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पहिल्यांदा स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी ती रद्द करून त्यांच्याजागी आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. स्मिता वाघ यांचा पत्ता कट करण्यामागे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांचा गट असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहे.

उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. डॉ. बी. एस. पाटलांनी बऱ्याचदा भाजपाच्या वरिष्ठांकडे उदय वाघ यांची तक्रार केली आहे. त्यातच स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर उदय वाघ यांचा गट वरचढ ठरेल, या भीतीनं डॉ. बी. एस. पाटील यांनी मोर्चेबांधणी करत ऐन वेळी स्मिता वाघ यांचा पत्ता कट केला होता. तसेच डॉ. बी. एस. पाटील यांनी स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचाही उदय वाघ यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना स्टेजवर घेऊ नका, असा उदय वाघ गटाचा आग्रह होता. परंतु तो डावलत गिरीश महाजनांनी त्यांना मंचावर बोलावले आणि उदय वाघ यांनी त्यांना मारहाण केली. अमळनेर येथे भाजपाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांची जाहीर प्रचार सभा प्रताप मिल परिसरात बुधवारी सायंकाळी झाली.


या सभेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते. सभा सुरू असताना स्मिता वाघ समर्थकांनी डॉ. बी. एस.पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवा, असे सांगत एकच घोषणाबाजी केली. यानंतर वाघ समर्थकांनी थेट व्यासपीठावर चढून डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण  करण्यास सुरुवात केली. मंत्री गिरीश महाजन हे सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा त्यांनाही समर्थकांनी धक्काबुक्की केली. यानंतर बी. एस. पाटील यांना व्यासपीठावरून खाली उतरवून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. हे मारहाण नाट्य जवळपास पाच ते सात मिनिटे सुरु होते.

काय आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे चित्र?
जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ए. टी. पाटील आहेत. त्यांचे तिकीट कापून भाजपाने सुरुवातीला आमदार स्मिता वाघ यांना तिकिट दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचेही तिकिट कापण्यात आले. आता या मतदार संघातून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील हे भाजपाकडून उमेदवारी करीत आहेत.

काय आहे नाराजी नाट्य ?
भाजपातर्फे जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी व विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र ऐनवेळी त्यांचे तिकिट कापून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.


डॉ. बी. एस. पाटील यांच्यावर राग का?
अमळनेरचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यात सुरुवातीपासून वाद आहेत. स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाल्यानंतर डॉ.बी.एस.पाटील यांनी उघड बंड पुकारत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी पारोळ्यात घेतलेल्या मेळाव्यात डॉ.बी.एस.पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ व स्मिता वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती.

भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. झालेला प्रकार हा गंभीर आहे. ज्याने हा प्रकार घडवून आणला असेल त्यांना सोडणार नाही. कारवाई ही निश्चित केली जाईल. डॉ.बी.एस.पाटील यांना मारहाण करीत असताना आपण कार्यकर्त्यांना सोडवित होतो. आपल्याला कोणतीही धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र.

Web Title: girish mahajan assaulted bjp shiv sena gathering amalne, Know entire politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.