"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही!’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला
By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 08:06 PM2020-11-28T20:06:56+5:302020-11-28T20:11:29+5:30
Supriya Sule News : आजच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे.
पुणे - कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लस मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनावरील लसीचे उत्पादन करत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसह अहमदाबाद आणि हैदराबादमधील संशोधन संस्थांचा दौरा केला. दरम्यान, आजच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाखो कोटींच्या गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. अखेरीस पु्ण्यामध्येच या कोरोनावरील लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाहीतर कुणीतरी म्हणेल की, मीच शोधली आहे म्हणून, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी याआधीही पुणे दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आपल्या जिल्ह्यात कोरोना लसीवर महत्त्वपूर्ण काम होत आहे आणि ते पाहण्यासाठी पंतप्रधान येत आहेत यापेक्षा आपल्या सरकारचं मोठं यश काय असू शकतं, असे विधान त्यांनी केले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी ४.४५ वाजता 'कोव्हीशिल्ड' या कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या 'सिरम' इन्स्टिट्यूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसची निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. या सव्वा तासांच्या भेटीनंतर मोदी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळाकडे निघाले.
मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेले होते. या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून ती तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
सिरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसेच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. लसेच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत पंतप्रधान समाधानी आहे.
कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही पूनावाला यांनी यावेळी सांगितले.