Goa Election 2022: “महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्यासाठी आम्ही गोव्यात प्रयत्न करु”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 12:38 PM2022-01-16T12:38:22+5:302022-01-16T12:40:21+5:30
Goa Election 2022: मोजके १०-१२ लोक गोव्याचे राजकारण करतायत, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात शिवसेनेला यश येताना दिसत नाही. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी उमेदवाऱ्या देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केले. गोव्यात हे होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गोव्यातील सामान्य लोकांना प्रस्थापितांविरुद्ध आम्ही उभा करू. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेले आहे. म्हणजे भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात गोव्याच्या राजकारणाची सूत्रे आहेत आणि ते गोव्याचे भविष्य ठरवतात. हे जर मोडायचे असेल, तर गोवेकरांनी आपल्यातील सामान्य लोकाना निवडणुकीत मतदान करावे आणि निवडून आणावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
मोजके दहा-बारा लोकच गोव्याचे राजकारण करतात
गोव्याचे राजकारण जर तुम्ही पाहिले, तर मोजके १०-१२ लोक गोव्याचे राजकारण करतात. तेच कधी या पक्षात असतात, तर कधी त्या पक्षात असतात, तेच ठरवतात गोव्याचे भविष्य, असे सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर महाराष्ट्रातही आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. परंतु, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखील चांगली सुरू होती, मात्र नाही होऊ शकले. राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील त्यांच्याशी चर्चा फिस्कटली. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही निवडणूक लढणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेस मनाने सत्तेवर आलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांचा वावर आहे. असू द्या, आम आदमी पार्टीचे तसेच दिसत आहे. त्यांना केवळ शपथ घेणेच बाकी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात दारोदारी प्रचार करत होते. दिल्लीत तर करोना एवढा वाढत आहे आणि इथे दारोदारी जात आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार द्या, जेव्हा ते स्वत: दारोदार जात होते, तेव्हा मी स्वत: त्यांना पाहिले आहे. चांगली गोष्ट आहे आपल्या पार्टीचा प्रचार करत आहेत, परंतु पाहूयात गोव्यात काय होतय, असे संजय राऊत म्हणाले.