ममता बॅनर्जींचा शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार फोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 08:41 AM2021-12-18T08:41:44+5:302021-12-18T08:48:23+5:30

अलीकडेच ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यात ममता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांची भेट घेतली

Goa NCP MLA Churchill Alemao joined TMC, Mamta Banerjee setback to Sharad Pawar | ममता बॅनर्जींचा शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार फोडला

ममता बॅनर्जींचा शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार फोडला

googlenewsNext

गोवा – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकाकी लढत देत ममता बॅनर्जी यांनी दणक्यात विजय मिळवला आणि बंगालमध्ये भाजपाचं सरकार आणण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं बहुमत मिळवत पश्चिम बंगालमध्ये आपणच वाघिण असल्याचं दाखवून दिले. मात्र बंगालच्या या विजयामुळे ममता बॅनर्जी यांना मोठं बळ दिले. पश्चिम बंगाल पाठोपाठ देशातील इतर राज्यातही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यात ममता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ममता यांचा पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार का? यावर त्यांनी नकार देत प्रादेशिक पक्ष जिथे कमकुवत आहे त्या राज्यात भाजपा विरोधकांना ताकद देणार असल्याचं त्यांनी सांगितले. या भेटीला काही दिवसच उलटले नाही तोवर ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसलाच मोठा धक्का दिला आहे.

गोवा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी त्याच्या कन्येसह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चर्चिल आलेमाव हे बाणावलीचे आमदार आहेत. चर्चिल आलेमाव यांच्या पक्षप्रवेशामुळे गोवा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आलं आहे. त्यातच चर्चिल हे एकमेव आमदार असल्याने त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कुठलाही कायदा लागू होत नाही. चर्चिल आलेमाव यांनी विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

चर्चिल आलेमाव यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीचा आक्षेप

आमदार चर्चिल आलेमाव यांनी टीएमसीत प्रवेश घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत. आलेमाव यांचा पक्षप्रवेश नियमानुसार नसून त्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष जोस फिलील डिसूझा यांनी केली आहे. मात्र राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असल्याने पक्षांतरबंदीचा कायदा लागू होत नाही असा दावा चर्चिल आलेमाव यांनी केला आहे.

ममता यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र जुने नाते आहे. भाजपाविरोधात जे एकत्र येतील त्या पक्षांचे स्वागत असेल. भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्तरावर एकसारखा विचार करणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकीत हा पर्याय उपलब्ध हवा. त्यासाठीच आमची भेट झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले होते.

Web Title: Goa NCP MLA Churchill Alemao joined TMC, Mamta Banerjee setback to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.