गोपाळ शेट्टी सातवी, ऊर्मिलाकडेही पदवी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:53 AM2019-04-16T01:53:02+5:302019-04-16T01:53:35+5:30
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र हे दोन्ही उमेदवार पदवीधर नाहीत. शेट्टी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. तर मातोंडकर यांचे शिक्षण एसवायबीएपर्यंत झाले आहे. उर्वरित उमेदवारांपैकी एक उमेदवार पीचडी, एक उमेदवार एमबीए आणि एक उमेदवार टेक्निकल क्षेत्रातील शिक्षण घेतलेला आहे.
लोकसभा असो, विधानसभा असो, पालिकांसारख्या निवडणुका असो. अशा निवडणुकांमध्ये आपल्या मतदारसंघातील उमेदवार उच्च शिक्षित असावा, अशी आशा मतदारांना असते.
मात्र एखाददुसरा उमेदवार वगळला तर उर्वरित उमेदवारांचे शिक्षण एसएससीच्या पुढे जात नाही. परिणामी मतदारांचा हिरमोड होतो. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून शेट्टी आणि मातोंडकर यांच्यातच प्रमुख लढत असून, हे दोघेही उच्च शिक्षित नसले तरी ऊर्मिला यांना बॉलीवूडचे वलय आहे आणि शेट्टी कार्यकर्त्यापासून खासदार झाले आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
>हे आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तव
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तीन उमेदवार पदव्युत्तर आहेत. दोघांकडे पदवी आहे. बारावी चार जण आहेत. दहावी एक जण आहे. वाणिज्य, कला, पीचडी आणि एमबीएचेही उमेदवार येथे आहेत. ज्या दोघांमध्ये चुरस आहे त्या दोन उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराकडे पदवी नाही; हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील वास्तव आहे.
उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाही
जग एकविसाव्या शतकात जगत असताना आपल्या देशातील आपले प्रतिनिधी किमान शिक्षित असावेत, अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. मात्र राजकारणाचा टेÑंड पाहता, राजकारणातील टीका पाहता; राजकीय क्षेत्रात उच्च शिक्षित तरुण उतरू पाहत नाहीत, अशी टीका सातत्याने होते. मात्र तरीही काही मतदारसंघांतून उच्च शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात असले तरीदेखील नव्याने राजकारणात येत असलेली पिढी उच्च शिक्षित असावी, अशी अपेक्षा मतदारांना असते.
>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?
पदवीधर असावा
जनतेच्या विकासाची ब्लू प्रिंट त्याच्याकडे असावी. संसदेमध्ये अशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून गेल्याने
देश महासत्ता होत नसून बेरोजगारीमुळे अधोगतीकडे वाटचाल होते. लोकप्रतिनिधी किमान पदवीधर असावा.
- सुरेश वाघमारे
अर्थकारण समजावे
किमान पदवीधर असावा. त्याला देशाचे अर्थकारण समजावे. नोकरी, अर्थकारण याबाबत त्याचा अभ्यास असावा. दिल्लीमध्ये बोलताना त्याने देशाच्या प्रश्नांवर बोलावे. यापैकी काहीच नसेल तर देशाचे, नागरिकांचे नुकसान होते. परिणामी शिक्षित उमेदवारांना संधी द्यावी.
- मंथन पाटील
किमान शिक्षण असावे
खासदार हे देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यांना इंग्रजीसोबतच हिंदी आणि स्थानिक भाषा आलीच पाहिजे. किमान शिक्षण असावे. आर्थिक प्रश्नांची जाण असावी. महत्त्वाचे म्हणजे तो किमान पदवीधर असावा. त्याला सामाजिक प्रश्नांची जाण असावी.
- विनोद घोलप