मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 09:30 AM2021-03-21T09:30:20+5:302021-03-21T09:31:23+5:30
shiv sena mp sanjay raut after param bir singh letter bomb: माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल; संजय राऊत यांचं सूचक विधान
मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनादेखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. 'अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,' असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"
राज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारमधील घटकानं आत्मपरिक्षण करावं. आपले पाय जमिनीवर आहेत की नाही ते तपासून पाहावं, असा सल्ला संजय राऊत यांनी सरकारला दिला. या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. यासंदर्भात अनेकदा मी सामनामधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी केलं. मी काही या सरकारचा घटक नाही. पण हे सरकार आणण्यासाठी मीदेखील थोडे प्रयत्न केले आहेत. मात्र मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही, असं राऊत म्हणाले.
मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या
संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वी एक शायरी ट्विट केली आहे. 'हमको तो तलाश बस नये रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राऊत यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबद्दल विचारलं असता, त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असा प्रश्न विचारला असता, विरोधकांच्या मागणीवर सरकार चालत नाही. विरोधी पक्षाच्या मागणीमुळे सरकारमध्ये उलथापालथ होत नाही, असं राऊत यांनी म्हटलं.