अभूतपूर्व प्रसंग! राज्यपालांना विमान नाकारलं; राजभवन-सरकार संघर्ष पेटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:29 AM2021-02-12T04:29:36+5:302021-02-12T07:06:58+5:30
अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव की राजकीय खेळी?
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. सरकारी विमानातून प्रवासाची परवानगी नाकारल्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ऐनवेळी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढवली. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नियमानुसार आठ दिवसांपूर्वीच संबंधित विभागाकडे विमानप्रवासाची परवानगी मागण्यात आली होती आणि याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळविण्यात आल्याचे राजभवनाने म्हटले आहे; तर, बुधवारी (दि. १०) रात्रीच विमान उपलब्ध नसल्याचे राजभवनाला कळविल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मसुरी येथे लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण संस्थेच्या नियोजित कार्यक्रमासाठी जायचे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोश्यारी होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी गुरुवारी सकाळी ९.२५ वाजता राज्यपाल राजभवनावरून निघाले. सकाळी १० वाजता राज्यपालांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. १०.३० वाजता विमानाचे उड्डाण अपेक्षित होते. मात्र, राज्यपाल विमानात बसल्यानंतर १५ मिनिटे झाले तरी विमान निघाले नाही. राज्य सरकारकडून परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आल्यावर राज्यपाल विमानतळावरील विश्रांती कक्षात गेले. दरम्यानच्या काळात राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या फोनाफोनीनंतरही परवानगी मिळाली नाही.
राज्यपालांनी किमान एकदा मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून घ्यावे, असे सुचविण्यात आले. मात्र, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याऎवजी खासगी कंपनीच्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यपालांसाठी खासगी कंपनीच्या विमानाचे तिकीट काढण्यात आले आणि दुपारी सव्वाबारा वाजता राज्यपाल डेहराडूनकडे रवाना झाले.
राज्यपालांना सरकारी विमानातून उतरावे लागल्याची घटना समोर येताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. राज्यपालांनी विधान परिषदेच्या सदस्यांची फाइल अडवून ठेवल्यानेच ठाकरे सरकारने त्यांना विमान नाकारल्याची चर्चा आहे. राजकीय आघाडीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच राजभवनातून विमानतळावरील घटनाक्रम समोर मांडण्यात आला. यावर, मुख्यमंत्री कार्यालयानेही खुलासा पाठवत राजभवनातील अधिकाऱ्यांंवरच जबाबदारी ढकलून दिली.
राज्यपाल काय म्हणाले?
डेहराडूनला पोहोचल्यानंतर राज्यपालांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ‘काही कारणाने ते विमान मिळाले नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला. एक विमान नाही आवडले तर दुसऱ्या विमानाने प्रवास केला.’ ‘ खासगी दौरा असल्याने परवानगी दिली नाही का?’ असे विचारले असता ‘आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?’ असा सवाल त्यांनी केला.
परवानगी मागितली होती - राजभवन
राज्यपाल कोश्यारी यांच्या डेहराडून दौऱ्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या सचिवालयाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना २ फेब्रुवारी रोजी, राज्यपालांना सरकारी विमानाचा वापर करण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र पाठविले होते. मुख्यमंत्री कार्यालयालाही कळविण्यात आले होते.
त्यानुसार, राज्यपाल सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले आणि सरकारी विमानात चढले. तथापि, राज्यपालांना सांगण्यात आले की, शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही.
खातरजमा करून घ्यायला हवी होती - सरकार
राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही, याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत सरकारची कुठलीही चूक नाही, असा खुलासा राज्य सरकारने केला.
शासकीय विमान घेऊन जाण्यास मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते, असा प्रघात आहे. यानुसार बुधवारी मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. मान्यता मिळाल्यावरच राजभवन सचिवालयाने नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते.
राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते. ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनानेही गंभीर दखल घेतली असून, राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.