Maharashtra Gram Panchayat Election Results: ‘आदर्श सरपंच’ म्हणून देशभरात नाव कमावलं; त्याच भास्कर पेरे पाटलांच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारलं
By प्रविण मरगळे | Published: January 18, 2021 12:54 PM2021-01-18T12:54:59+5:302021-01-18T12:56:52+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results: या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
औरंगाबाद – राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकाल लागत आहेत, यात अनेक प्रस्थापितांना धक्के पोहचले आहे, यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निकालात गावकऱ्यांनी काही ठिकाणी धक्कादायक कौल दिले आहेत, यातच पाटोदा ग्रामपंचायतीत लागलेला निकाल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, ज्या पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचलं त्यांच्याच पॅनेलला गावकऱ्यांनी नाकारल्याचं चित्र आहे.
पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली, या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या होत्या.
भास्करराव पेरे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत माघार घेत मुलीला उभं केलं होतं, ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे आमिष दाखवून कोणी बिनविरोध करू पाहत असेल, तर निवडणूक व्हायला हवी. गावाच्या भल्यासाठी झटू पाहत असलेल्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन भास्करराव पेरे-पाटील यांनी लोकांना केले होते. ग्रामपंचायतीला निधी खूप येतो, पैशाची कमतरता नसते, परंतु नियोजन न करता तो निधी खर्च केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं.
गेल्या २५ वर्षापासून पाटोदा ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून भास्करराव पेरे पाटील काम करत होते, या काळात पेरे पाटलांनी गावचा जो विकास केला त्याचं कौतुक फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात झालं, आदर्श गाव म्हणून पाटोद्याला ओळख मिळाली, यंदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला, गावच्या तरूण पिढीला पुढे आणण्यासाठी मी माघार घेतली आहे. मुलीने निवडणुकीत अर्ज केला आहे, परंतु तिला स्वीकारावं की नाकारावं हा सर्वस्वी निर्णय गावकऱ्यांचा असल्याचं भास्करराव पेरे पाटील म्हणाले होते.