Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र सैनिकांना दिलं आश्वासन
By प्रविण मरगळे | Published: January 20, 2021 06:10 PM2021-01-20T18:10:33+5:302021-01-20T18:12:22+5:30
शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई - राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढवा, असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले होते, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उमेदवार उभे केले, स्थानिक पॅनेल उभं करून ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली, कार्यकर्त्यांच्या बळावर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवलं, त्यामुळे या कार्यकर्त्यांचे कौतुक राज ठाकरेंनी केले आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्या तुलनेत मनसेला मिळालेलं यश कमी असलं तरी नोंद घेण्यासारखं आहे. शहरी भागातील पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या मनसेने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या अशी सूचना राज यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 20, 2021
ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचं यश
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मनसेने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे, बीड, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, याठिकाणी मनसेने आपलं अस्तित्व दाखवून दिलं. अंबरनाथ येथील काकोळे ग्रामपंचायत मनसेने बाजी मारली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ९ सदस्य निवडून आले आहेत. अमरावतीतील अचलपूर तालुक्यात खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत मनसेचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात शिरपूर ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. तेथे ७ पैकी ६ सदस्य निवडून आले आहेत.
रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायतीत मनसेने खाते उघडले आहे. बीडच्या केज तालुक्यातील नारेवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने वर्चस्व मिळवलं आहे, याठिकाणी ७ पैकी ५ जागांवर मनसेच्या सदस्यांचा विजय झाला आहे. बुलढाण्यात जिगाव ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची २५ वर्षाची सत्ता उलथवून मनसेने विजय पटकावला आहे. जिगाव ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात आली आहे. याठिकाणी ९ पैकी ७ जागांवर मनसेने विजय मिळवला आहे. तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. उस्मानाबादमध्ये जळकोटमध्ये जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळवला आहे. औरंगाबादच्या रेणापूरमध्ये मनसेने ७ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. रायगडच्या जोहे येथे मनसेचा १ उमेदवार जिंकला आहे. जुन्नरच्या खिल्लारवाडी ग्रामपंचायतीवर मनसेने झेंडा फडकवला आहे. तर यवतमाळच्या वणी तालुक्यात मनसेने तब्बल १५ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.