गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका
By ravalnath.patil | Published: September 25, 2020 10:38 AM2020-09-25T10:38:21+5:302020-09-25T10:47:54+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
नागपूर : बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. पण, ते भाजपाचे नेते असल्यासारखे बोलत होते, अशी खोचक टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी दोन दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. विशेष म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. याबाबत अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर अनिल देशमुख यांनी निशाणा साधला.
बिहारचे माजी डीडीपी गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. गेल्या दीड- दोन महिन्यापासून आपण त्यांना पाहत होतो. ते असे बोलायचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत, असे वाटत होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे बोलणे उचित नव्हते, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर, गुप्तेश्वर पांडे ज्या प्रकारे बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्यं असायची, त्यावरून तरी ते भाजपा नेते आहेत, असे जाणवत होते. आता राजीनामा दिल्यानंतर ते भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांचा अंदाज येतो, असे अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ते एनडीएचे उमेदवार म्हणून राजकीय मैदानात आपले नशीब अजमावण्याची शक्यता आहे. याआधी गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते. गुप्तेश्वर पांडे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांची बिहारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ २८ फ्रेबुवारी २०२१ पर्यंत होता. मात्र, त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांकडून पटनामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्या आदेशानंतर बिहार पोलिसांचे एक पथक तपासासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी या पथकातील आयपीएस विनय तिवारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला होता.
आणखी बातम्या..
- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ
- Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग
-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो