हरियाणाचे खट्टर सरकार अडचणीत;... तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 08:17 AM2020-12-03T08:17:55+5:302020-12-03T08:19:34+5:30
Farmer Protest, MSP: भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पार्टी (JJP) ने शेतकरी आंदोलनावर मोठे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन गेल्या आठवडाभरापासून सुरु आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी केलेले कृषी कायदे याला कारणीभूत असून याची झळ आता हरिय़ाणा सरकारलाही बसू लागली आहे. हरियाणामध्ये भाजपाचे सरकार असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्र्यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पार्टी (JJP) ने शेतकरी आंदोलनावर मोठे वक्तव्य केले आहे. हरियाणा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी दुष्यंत चौटाला (Dushyant Chuatala) असे पर्यंत शेतमालाच्या एमएसपीवर कोणतेही गंडांतर येऊ देणार नाही. जर शेतकऱ्यांना एमएसपीवर नुकसान झाले तर चौटाला तात्काळ राजीनामा देतील, असा इशारा जेजेपीने दिला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी देखील जेजेपीने केली आहे.
जेजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रतीक सोम यांनी आयएनएसला ही माहिती दिली आहे. आम्ही नेहमी शेतकऱ्यांचा विचार करतो. शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की चौटाला चंदीगढमध्ये असेपर्यंत एमएसपीवर गदा येऊ देणार नाही. तरीही जर दगाफटका झालाच तर पहिला राजीनामा हा चौटाला यांचा असेल, असे ते म्हणाले.
जेजेपी चौधरी देवीलाल यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आम्ही केंद्र सरकारकडे सहानुभूतीने मागण्यांवर विचार करण्याची मागणी केली आहे. एमएसपीवर सरकारला ठोस आश्वासन मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करून मुद्दे सोडवेल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.
कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांचा एल्गार; रास्ता रोको करणार
नव्या कृषी कायद्यांविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्धार अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटनांनी केला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी आज एल्गार पुकारणार आहेत.
महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांचे कार्यकर्ते सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल.