अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की...
By प्रविण मरगळे | Published: October 2, 2020 04:02 PM2020-10-02T16:02:19+5:302020-10-02T17:12:53+5:30
Hathras GangRape, CM Yogi Aadityanath News: उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे.
लखनऊ – हाथरस बलात्कार प्रकरणाने उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली, या पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांनी तिच्या कुटुंबांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कारही केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामुळे देशभरात उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकारबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकरणात अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की, उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा संपूर्णत: नाश निश्चित आहे. या दोषींना अशाप्रकारे शिक्षा मिळेल की भविष्यात ते उदाहरण म्हणून दाखवलं जाईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 2, 2020
इन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा।
आपकी @UPGovt प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है।
यह हमारा संकल्प है-वचन है।
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले
राहुल गांधींना अटक व धक्काबुक्की
पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाललेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवर अडवून ताब्यात घेतले व काही वेळानंतर त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून दिले. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना ढकलून देण्यात आले. ताफा अडवल्यानंतर हाथरसकडे पायी निघालेले काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापटही झाली. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसने निदर्शने केली आहे. योगी सरकार भरखास्त करा, आता भाजपा गप्प का? असा सवालही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हाथरसला निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, चेन्नई यासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. राहुल गांधी पोलिसांना चुकवून हाथरसला जाण्याची योजना आखत असल्याचंही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता
हाथरस येथील बलात्कार पीडित दलित मुलीला उपचारांसाठी आम्ही दिल्लीतील एम्समध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता. तिला सफदरजंग रुग्णालयात कसे दाखल करण्यात आले हे माहित नाही असे अलिगढ येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शाहिद अली यांनी म्हटलं आहे. अलिगढमधील या रुग्णालयात दलित मुलीवर दोन आठवडे उपचार सुरू होते. त्यानंतर तिला दिल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून घेतली दखल
हाथरस प्रकरणाची अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून दखल घेतली असून, याबाबत १२ ऑक्टोबरपर्यत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश राज्यातील गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि हाथरसच्या पोलिसांना दिले आहेत.
बलात्कार झाला नाही शवचिकित्सा निष्कर्ष
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या शवचिकित्सेतून आढळून आले आहे. ही माहिती त्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या दलित मुलीचा मृत्यू गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमुद करण्यात आले आहे. तिच्या शवचिकित्सेमध्ये वीयार्चे अंश आढळून आले नाहीत.
शवविच्छेदन अहवालात काय ?
- बलात्काराचा उल्लेख नाही
- पीडितेच्या मणक्याला दुखापत
- तरुणीच्या मानेलाही दुखापत
- पीडितेला हार्ट अटॅक आला होता
- ब्लड इन्फेक्शन झाले होते
- २९ सप्टेंबर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू