Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे’’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:22 AM2021-06-14T09:22:08+5:302021-06-14T09:37:42+5:30
Raj Thackeray Birthday: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे.
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसैनिकांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनीही राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं विशेष कौतुक केले आहे. त्यानिमित्त केदार शिंदे यांनी फेसबुकवर खास पोस्ट लिहून राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वामधील पैलूंचे वर्णन केले आहे. (MNS in Maharashtra Politics)
या फेसबूक पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतात की, राज ठाकरे हे राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो की, तो राजा माणूस आहे. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे. संगीत, चित्रपट या दोन क्षेत्रातला त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही. मैत्री करावी तर या राजा माणसाशी. सतत लक्ष असतं त्यांचं. सतत संपर्कात असतात.
केदार शिंदे पुढे म्हणतात की, वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत. या कोरोनाच्या कठीण परीस्थितीमध्ये हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवलय. मान्य करायालाच हवं. एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही.
त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm.. आपण इतक्या लोकांना संधी दिली. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली. एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ. नक्कीच आपल्यावर "राज्य" येणार नाही, याची ते काळजी घेतील. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे गिफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील, अशी अपेक्षाही केदार शिंदे यांनी व्यक्त केली.