हीना गावित यांचा राष्ट्रीय विक्रम; ५४ वर्षांनी मोठ्यास केले पराभूत
By प्रेमदास राठोड | Published: April 15, 2019 05:32 AM2019-04-15T05:32:27+5:302019-04-15T05:36:16+5:30
२००९ मध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ४८ खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षे होते, गेल्या वेळी हे वयोमान दोन वर्षांनी कमी म्हणजे सरासरी ५२ वर्षे होते.
- प्रेमदास राठोड
२००९ मध्ये महाराष्ट्रातून विजयी झालेल्या ४८ खासदारांचे सरासरी वयोमान ५४ वर्षे होते, गेल्या वेळी हे वयोमान दोन वर्षांनी कमी म्हणजे सरासरी ५२ वर्षे होते. देशात मात्र उलट स्थिती होती. २००९ मध्ये देशात विजयी झालेल्या खासदारांचे सरासरी वयोमान ५३ वर्षे होते, ते गेल्या निवडणुकीत एका वर्षाने वाढून ५४ वर्षे झाले.
२००८च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लोकसभेसाठी दोन सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यात वयाने ५४ वर्षे ज्येष्ठ उमेदवारास पराभूत करण्याचा राष्ट्रीय विक्रम २०१४ साली नंदूरबारमध्ये डॉ. हीना गावित (भाजप) यांनी केला. त्यावेळी २६ वर्षीय डॉ. हीना यांनी ८० वर्षीय माणिकराव गावित (काँग्रेस) यांचा पराभव केला. या (२०१९) निवडणुकीतही हे दोघे नंदूरबारमध्ये उतरले आहेत. हीना यांच्यापूर्वी २००९ साली म.प्र.च्या मंदसौरमध्ये ३६ वर्षीय मीनाक्षी नटराजन (काँग्रेस) यांनी वयाने ४४ वर्षे मोठे डॉ. लक्ष्मीनारायण पांडेय (भाजप) यांना पराभूत केले होते. वयोवृद्धाने त्याच्याहून ४९ वर्षे लहान उमेदवारास हरविण्याचा विक्रम २०१४ साली उ.प्र.च्या कैरानामध्ये भाजपचे वयोवृद्ध उमेदवार हुकुम सिंग यांनी केला. त्यावेळी ७५ वर्षीय हुकुम सिंग (भाजप) यांनी २६ वर्षीय नाहीद हसन (सपा) यांना २.३६ लाख मतांनी पराभूत केले होते. २००९ मध्ये आसामच्या जोरहटमध्ये ७७ वर्षीय कृष्णा बिजॉय (काँग्रेस) यांनी वयाने ४३ वर्षे लहान उमेदवार कामाख्य तसा (भाजप) यांना हरविले होते.
गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशात विजयी १,०८६ उमेदवारांपैकी ५४६ जणांनी वयाने ज्येष्ठांचा पराभव केला, तर ५२२ ज्येष्ठांनी वयाने लहान उमेदवारांना पराभूत केले. १८ ठिकाणी विजयी व पराभूत उमेदवार दोघेही समान वयाचे होते. ज्येष्ठांवर मात करणाऱ्यांचे प्रमाण देशात जास्त असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण समसमान आहे. महाराष्ट्रात वयाने मोठ्या उमेदवारांवर आणि वयाने लहान उमेदवारांवर विजय मिळविणाऱ्यांची संख्या समसमान म्हणजे ४७-४७ आहे. उर्वरित २ ठिकाणी विजयी व पराभूत उमेदवार समान वयाचे होते.
डॉ. हीना गावित यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात २०१४च्या निवडणुकीत राजू शेट्टी (हातकणंगले) आणि राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण-मध्य) या दोघांनी वयाने खूप ज्येष्ठ उमेदवाराचा पराभव केला. ४६ वर्षीय राजू शेट्टी यांनी ३६ वर्षांनी मोठे कलप्पा आवाडे (वय त्यावेळी ८२) यांचा तर ४१ वर्षीय राहुल शेवाळे यांनी वयाने ३३ वर्षांनी मोठे एकनाथ गायकवाड (वय त्यावेळी ७४) यांचा पराभव केला होता. शेवाळे व गायकवाड यंदा पुन्हा मुंबई दक्षिण-मध्ये समोरासमोर आहेत. २००९च्या निवडणुकीत वयाने ३० वर्षे ज्येष्ठ राम नाईक (वय त्यावेळी ७४) यांना संजय निरुपम यांनी मुंबईत उत्तरमध्ये पराभूत केले. गेल्या वेळी शिवसेनेच्या भावना गवळी (यवतमाळ), डॉ. सुनील गायकवाड (लातूर) आणि शरद बनसोडे (सोलापूर) या तिघांनी वयाने २५ वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ नेत्यांचा पराभव केला होता.
अकोल्यात गेल्या वेळी ५५ वर्षीय संजय धोत्रे यांनी त्यांच्याच वयाचे हिदायत पटेल यांचा आणि बारामतीत ४४ वर्षीय सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याच वयाचे महादेव जानकर यांना पराभूत केले होते. अकोल्यात पुन्हा समवयस्क धोत्रे-पटेल हे दोघे आणि त्यांच्यापेक्षा ४ वर्षांनी मोठे प्रकाश आंबेडकर यांच्यात सामना आहे. गेल्या वेळी देशातून २६ वर्षे वयाचे ५ जण लोकसभेत पोहोचले, त्यात महराष्ट्रातील डॉ. हीना गावित (नंदूरबार) आणि रक्षा खडसे (रावेर) या दोघींचा समावेश होता. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये गेल्या वेळी बाजी मारलेले गजानन कीर्तिकर (वय ७०) हे राज्यातील सर्वांत ज्येष्ठ विजयी उमेदवार होते. २००९मध्ये बाजी मारलेले डॉ. नीलेश राणे (वय २८) हे त्यावेळी सर्वांत तरुण तर माणिकराव गावित (वय त्यावेळी ७५) हे सर्वांत ज्येष्ठ उमेदवार होते.