छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा
By बाळकृष्ण परब | Published: January 23, 2021 06:09 PM2021-01-23T18:09:57+5:302021-01-23T18:12:16+5:30
Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणांमधील काही विधानांचा समावेश करून शिवसेनेला चिमटा काढला आहे.
मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त आज सकाळपासूनच राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमधून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. तसेच ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणांमधील काही विधानांचा समावेश करून शिवसेनेला चिमटा काढला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अलीकडच्या राजकारणामध्ये आपण बघतो. खूप वेळा नेत्यांची मनं छोटी छोटी होतात. ते आपल्यापलीकडे पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांच मन राजासारखं होतं. जे चैतन्य बाळासाहेब तयार करायचे ते मात्र अप्रतिम असायचं. म्हणजे निवडणुका हरो का जिंको. बाळासाहेब येऊन गेल्यानंतर जिंकल्याची मजा यायची.
या ट्वीटच्या पुढच्या भागात बाळासाहेबांच्या भाषणातील काही उद्गार समाविष्ट केले आहेत. ह्यह्णमी फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे. ज्या जनतेनं विश्वासानं निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता. पैशाकरता. भांडण काय तुमचं. खुर्चीवरचं. छे छे खुर्चीसाठी भांडायचं नाही. पैशासाठी लाचार व्हाल तर भगवा झेंडा हातात ठेऊ नका. हे दोष तुमच्या मराठ्यांच्या रक्तात असता कामा नये याची काळजी घ्या, असे आवाहन या व्हिडीओमध्ये बाळासाहेब करताना दिसत आहेत. बाळासाहेबांचे हे उद्गार ट्वीटमध्ये समाविष्ट करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून युती तोडण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवता आलं पाहिजे. त्या तेजाला मग कुणी हात लावू शकणार नाही. तुटलात तर संपलात. आदरानं लोकं पाहताहेत तो आदर तसाच ठेवा, असे आवाहन करणारी चित्रफीतही देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओत समाविष्ट केली आहे.