अखेर हिमंत बिस्वा सरमा होणार आसामचे मुख्यमंत्रीपदी, उद्या घेणार शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:04 PM2021-05-09T14:04:24+5:302021-05-09T14:14:11+5:30
himanta biswa sarma : मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला.
गुवाहटी : अखेर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज झालेल्या भाजपाच्या विधीमंडळ दलाच्या बैठकीत हिमंत बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तसेच, आसामचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात आलेले केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, उद्या म्हणजेच सोमवारी हिंमत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. (himanta biswa sarma will be the new chief minister of assam)
आज सकाळी 11 वाजता दिसपूर येथे भाजपाच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बीएल संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्वा सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, भाजपाच्या विधीमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. हिमंत बिस्वा शर्मा आज संध्याकाळी राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेणार असून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते.
दरम्यान, आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, भाजपाने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा या दोन्ही नेत्यांपैकी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी सर्बानंद सोनोवाल आणि हिमंत बिस्वा सरमा यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी दिल्लीत बोलविले होते. यावेळी आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून हिंमत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
(पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण)
हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता
2016 मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपाने सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत भाजपाकडून आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
("आदित्य ठाकरेंची मंत्रिपदी नियुक्ती केली, त्याचप्रमाणे...", गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)
कोण आहेत हिमंत बिस्वा सरमा?
हिमंत बिस्वा सरमा यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने 15 मे 2001 पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. 1996 ते 2005 पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिलं आहे. 1 फेब्रुवारी 1969मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम साहित्य संस्थांशी संबंधित आहे. सरमा यांनी कामरुपमध्ये अकादमी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयात त्यांनी पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. राजकारणात असतानाच त्यांनी पीएचडीही केली.