अपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार
By प्रविण मरगळे | Published: September 27, 2020 09:02 PM2020-09-27T21:02:09+5:302020-09-27T21:02:42+5:30
हा जखमी तरुन आरोग्य विभागातील कर्मचारी असून वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहे. त्याचं नाव बी. सी पवार असं आहे.
जळगाव – भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला, त्याला पाचोरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. या अपघातात गिरीश महाजन यांना सुदैवाने काहीही झालं नाही. पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर आज संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार गिरीश महाजन मुंबईहून काम संपल्यानंतर जामनेर येथील त्यांच्या निवासस्थानी चालले होते, त्यावेळी पाचोरा तालुक्यातील लोहरा-वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वाराने धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ गिरीश महाजन यांनी गाडी बाजूला घेत दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी सरसावले. गिरीश महाजनांनी या जखमी तरुणाला स्वत:च्या गाडीत बसवून पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
हा जखमी तरुन आरोग्य विभागातील कर्मचारी असून वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहे. त्याचं नाव बी. सी पवार असं आहे. लाहोरा-वरखेडी येथील रस्त्याची दुर्दशा झाल्याने अनेक अपघात होतात, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गिरीश महाजन यांची गाडीही याच मार्गावर जात होती, तेव्हा खड्ड्यांचा अंदाज चुकल्याने दुचाकीस्वार गिरीश महाजनांच्या गाडीला येऊन आदळला आणि तो खाली पडून त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.