सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देणार; कमल हासन यांची मोठी घोषणा
By कुणाल गवाणकर | Published: January 5, 2021 07:05 PM2021-01-05T19:05:03+5:302021-01-05T19:05:31+5:30
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध
नवी दिल्ली: चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाची स्थापना करणाऱ्या कमल हासन यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठी घोषणा केली आहे. कमल हासन यांच्या पक्षाचा जाहीरनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना दर महिन्याला पगार देऊ, अशी घोषणा हासन यांनी केली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हासन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे.
तमिळनाडू विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी कमल हासन यांनी प्रचार सुरू केला आहे. पक्ष सत्तेत आल्यास कोणकोणत्या योजना राबवल्या जातील, याची माहिती देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. 'शिक्षण, रोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देण्यात येईल. गृहिणींकडे अनेकदा समाजाचं दुर्लक्ष होतं. त्यांच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मासिक वेतन देईल. त्यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढेल. यासाठी पक्ष सुशासन आणि आर्थिक विषयांसंदर्भात सात कलमी कार्यक्रम राबवेल,' असं कमल हासन म्हणाले.
I welcome @ikamalhaasan’s idea of recognising housework as a salaried profession, w/the state govt paying a monthly wage to homemakers. This will recognise & monetise the services of women homemakers in society, enhance their power& autonomy & create near-universal basic income.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 5, 2021
काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी कमल हासन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे. गृहिणींना मासिक वेतन मिळाल्यास त्यांना ओळख मिळेल, असं थरुर म्हणाले. आपल्या पक्षाचा अजेंडा जनतेसमोर ठेवताना कमल हासन यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुकवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 'भ्रष्टाचारात बरबटलेले लोक जनतेला नको आहेत. जनतेला त्यांच्यापासून सुटका हवी आहे. आमच्या पक्षाला जनतेकडून खूप प्रेम मिळत आहे. जनतेला भ्रष्ट मंडळी नकोत, तर बदल हवा आहे, हेच यातून दिसतं,' असं हासन यावेळी म्हणाले.