शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसैनिक मत कसे देणार? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:39 AM2019-04-27T05:39:25+5:302019-04-27T07:00:51+5:30
रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप
मुंबई : रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांनी प्रज्ञा ठाकूरला भाजपची उमेदवारी दिली. मात्र, शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वीचा शिवसेनेने निषेध का नोंदवला नाही? २००८ च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र शिवसेनेच्या शाखेत लावले गेले. आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
कुर्ला नेहरूनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मुंबई पोलिसांच्या धैर्यामुळे कसाब जिवंत पकडला गेला. त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी संबंध समोर आले. ज्या पोलिसांनी देशाचे रक्षण केले त्यांचा अपमान सहन करून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पोलीस, निमलष्करी दलाचा आदर करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिकावे. मुख्यमंत्री पदाची नशा चढू देऊ नका, असेही त्यांनी ठणकावले.
शिवसेनेला भाजपच्या कुबड्यांची गरज का पडली? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी खोटारड्या मोदींना घरी बसवावे, पर्याय कोण याची काळजी करू नये. देशात लोकशाही आहे त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी मोदी स्वत:च्या कुटुंबाशी कसे वागले हे पाहावे. मोदींनी अजून रॉबर्ट वड्राला तुरुंगात का टाकले नाही? याचे उत्तर द्यावे. प्रियांका गांधी वाराणसीमधून मोदींविरोधात लढण्याचे सांगून नवऱ्याची काही प्रकरणे ‘सेटल’ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोदी हे सर्वांत मोठे ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी आतापर्यंत ब्लॅकमेल करून राजकारण केले आहे. मोदी खोटारडे व्यक्तिमत्त्व आहे. बालाकोट हल्ल्यामध्ये एकही दहशतवादी मेला नाही, याचा खुलासा सुषमा स्वराज्य यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांचे
वर्तन बालीश असून, त्यांच्या खोटारडेपणामुळे देश तोंडावर पडल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस ही भाजपची ‘ए’ टीम - आनंदराज
आनंदराज आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप चुकीचा आहे. प्रत्यक्षात काँग्रेस ही भाजपची ‘ए’ टीम आहे. काँग्रेसने नेहमीच दलित मुस्लिमांची फसवणूक केली. त्यामुळे वंचित आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या वेळी निहारिका खोंदले, अनिल कुमार, संजय भोसले, सुरेश शेट्टी, सुनील थोरात हे मुंबईतील सर्व सहा उमेदवार तसेच शुजात आंबेडकर, अशोक सोनावणे उपस्थित होते.
ओवेसींची मुंबईतील प्रचाराकडे पाठ
वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील प्रचाराकडे पाठ फिरवल्याने एमआयएम व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावारण आहे. भिवंडी येथील प्रचारसभेला उपस्थित राहून ओवेसी यांनी हैदराबादकडे प्रस्थान केले. आंबेडकर व ओवेसी यांची संयुक्त जाहीरसभा झाली नसल्याने कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. कुर्ल्यातील सभेला एमआयएमचा एकही महत्त्वाचा नेता उपस्थित नव्हता.