ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजपा आमदारानं दाखवली आमंत्रण पत्रिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:53 AM2021-03-31T11:53:38+5:302021-03-31T11:55:58+5:30
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात आलं नाही, यावरून भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन जुन्या महापौर निवासस्थानी पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांची उपस्थिती असणार आहे. इतरांना हा कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार आहे.(BJP Nitesh Rane Criticized Shivsena & Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray Memorial lands Worship Programme)
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात आलं नाही, यावरून भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. नितेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत असा टोला त्यांनी लगावला.
आज मा. बाळासाहेब असते तर,
— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2021
पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते.
मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस !
राजा होण्यासाठी मन मोठं लागतं,
त्यांच्यानंतर...
फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!
त्याचसोबत ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला MMRDA मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनाही निमंत्रण दिलं नाही का? असा प्रश्न नितेश राणेंनी विचारत निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, सचिव सुभाष देसाई, MMRDA प्राधिकरण, आभा लांबा वास्तूविशारद आणि कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट्स यांची नावं लिहिण्यात आली आहेत. मात्र MMRDA ची जबाबदारी असणारे मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
How come MMRDA Minister Eknath Shindeji not invited ?
— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2021
Protocol?
Interesting!! pic.twitter.com/k4Gu9s5Ey7
राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. संदीप देशपांडे म्हणतात की, स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”
ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक
या स्मारकाबद्दल सुभाष देसाईंनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याची माहिती देसाईंनी दिली आहे.
दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!