‘चंपा’, ‘टरबुजा’ म्हटलेलं कसं चालते?; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:29 AM2020-06-29T02:29:13+5:302020-06-29T02:30:03+5:30
भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दांत टीका होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलदेखील वाईट शब्द वापरले जातात.
कोल्हापूर : गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत. मग भाजपच्या नेत्यांना ‘चंपा’, ‘टरबुजा’ असे म्हटलेले कसं चालतं? असा सवाल करत कुणी कुणाला धमकी द्यायची गरज नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचे नाही, याचा शेवट काहीही होऊ शकतो, असा इशाराही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘आम्हीही ठेवणीतील शिव्या देऊ शकतो,’ असा इशारा दिला. याबाबत पाटील म्हणाले, भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दांत टीका होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दलदेखील वाईट शब्द वापरले जातात. राज्यात कोण ‘चंपा’ म्हणतं, कोण ‘ टरबुजा’ म्हणतं, हे कसं चालतं? सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचं नाही, मात्र महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती व्यवस्थित केली पाहिजे, अन्यथा त्याचा शेवट काहीही होऊ शकतो.