इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा पेच कसा सोडवणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:52 AM2019-01-25T01:52:57+5:302019-01-25T01:53:04+5:30

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होतात, होतात का वेगळ्या होणार, हा संभ्रम कायम आहे.

How to fix the scarcity of Indapur's Assembly seat? | इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा पेच कसा सोडवणार ?

इंदापूरच्या विधानसभेच्या जागेचा पेच कसा सोडवणार ?

Next


- सतीश सांगळे
कळस : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होतात, होतात का वेगळ््या होणार, हा संभ्रम कायम आहे. मात्र इंदापूर तालुक्यात लोकसभेपेक्षा विधानसभा मतदार संघाची चर्चा जास्त आहे. लोकसभा प्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी होण्याचे संकेत दोन्ही पक्ष प्रमुखांनी दिले आहेत. मात्र राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये इंदापूर तालुक्यातील विधानसभा जागेचा पेच कसा सोडवणार याकडे लक्ष लागून आहे. तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच तूल्यबळ पक्ष आहेत. भाजपा व शिवसेना महायुतीची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोवताली राजकारण फिरत आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याचे विद्यामान आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही जागा दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी नाही झाली तरी चालेल पण राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा कदापी सोडणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये विद्यामान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर विधानसभा उमेदवारीवरून बाजार समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे यांनी दावेदारी दाखल केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी ही तालुक्यात संघटन केले आहे. माने यांनी देखील विधानसभा लढविण्याची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यामान आमदार दत्तात्रय भरणे यांना पक्षांतर्गत गटबाजीला देखील सामोरे जावे लागणार आहे. तसेच उमेदवारी मिळवताना या दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन संघटीतपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान असणार आहे.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे राज्यातील मातब्बर नेते आहेत. त्यांनी १९ वर्षे मंत्रिमंडळामध्ये काम केले आहे. इंदापूर हा काँग्रेसचा १९५२ पासून बालेकिल्ला आहे. यामुळे इंदापूरच्या जागेवर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगितला जातो. पराभवानंतर पाटील हे देखील तालुक्यात चांगले सक्रिय झाले आहेत. पक्षांच्या कमकुवत बांजूना भक्कम करण्यासाठी त्यांनी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले आहेत. वरिष्ठ पातळीवर इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय तोडगा निघणार, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघात जागावाटपात आघाडीकडून जागा कोणालाही गेली तरी हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीच्या तूल्यबळ उमेदवारात लढत अटळ आहे आघाडीचा उमेदवार विरुद्ध अपक्ष किंवा भाजपा यांच्या वतीने लढत होण्याची शक्यता आहे.
>शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
इंदापूर विधान सभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेमध्ये येत असलेमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. २००४, २००९ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवरा यांनी पाटील यांच्यासाठी सांगता सभा घेत पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र २०१४ ला त्यांना पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या सांगता सभेसाठी वेळ देता आला नाही. बारामती लोकसभेच्या मतदारसंघात जातीय समीकरणे महत्वाची आहेत. तसेच मतदार संघातील हर्षवर्धन पाटील यांचा असलेला प्रभाव यामुळे पवार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे

Web Title: How to fix the scarcity of Indapur's Assembly seat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.