फडणवीसजी, मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली ते सांगा- काँग्रेस नेते नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:24 AM2021-04-04T04:24:18+5:302021-04-04T06:53:29+5:30
केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करीत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य करताना पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या पॅकेजची आकडेवारी देत राज्य सरकारच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली, हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पटोले म्हणाले, मागील वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटांचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमीच तत्पर राहिले आहे. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपचे नेते मात्र राज्य सरकारविरोधात कटकारस्थाने करीत राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली.
मोदींनी जाहीर केलेल्या त्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? त्यापैकी महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत, असेही नाना पटोले म्हणाले.