जागा वाटपावर अडले युतीचे घोडे, सेनेला हवे पालघर; भाजपाने मारली मेख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:40 AM2019-01-29T04:40:55+5:302019-01-29T06:40:43+5:30
भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांना अल्टिमेटम दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.
मुंबई : भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून दोन्ही पक्षांनी एकमेकांना अल्टिमेटम दिल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. विधानसभेच्या प्रत्येकी १४४ जागा दोन्ही पक्षांनी लढवाव्यात, असा भाजपाचा प्रस्ताव आहे, तर शिवसेनेला पालघर लोकसभेची जागा हवी असून त्या बदल्यात सातारा भाजपाने घ्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सोमवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव यांनी निर्वाणीची भाषा करत भाजपाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला. तर जालना येथे झालेल्या भाजपा कार्य समितीच्या बैठकीत भाजपानेही स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली. युतीसाठी आम्ही लाचार होणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला इशारा दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी १४४ जागा भाजपा-शिवसेनेने लढाव्यात, असा भाजपाचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रस्तावात भाजपाने एक मेख घातल्याने तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून युतीच्या मित्रपक्षांना (रिपाइं, रासपा आदी) जागा द्याव्यात, अशी ती अट टाकली असल्याचे समजते. तर शिवसेनेला लोकसभेच्या काही जागांची अदलाबदल करून हवी आहे. पालघर आणि भिवंडीसाठी शिवसेना आग्रही आहे; पण त्यावर तुटेपर्यंत ताणायचे नाही, असे धोरण आहे. लोकसभा, विधानसभेच्या जागावाटप एकाचवेळी जाहीर करावे, असा सेनेचा आग्रह आहे.
मोठा भाऊ आम्हीच- खा. राऊत
भाजपा-शिवसेनेत युतीसाठी चर्चा सुरू असताना शिवसेनेने मात्र त्याचा इन्कार केला. खासदारांच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते खा.संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे व राहणार. दिल्लीचे तख्त हा मोठा भाऊ गदागदा हलविणार. भाजपाकडून युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. सगळ्या अफवा आहेत. देशभरात ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्वांचाच आयकर माफ करावा, असा ठराव बैठकीत मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.
फाजील आत्मविश्वास बाळगू नका - अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांनी फाजील आत्मविश्वास बाळगू नये. जनमताचा कौल कोणाकडे आहे आणि आमच्या जनसंघर्ष यात्रेचा नेमका किती परिणाम झाला, हे मतदानानंतर समजेलच. जनतेत असलेली नाराजी मुख्यमंत्र्यांना लवकरच कळेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.