मुरबाडमध्ये शिवसेनेकडून विरोधकांना मोठा धक्का, ३३ ग्रामपंचायतींच्या सरपंच,उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्ते शिवबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 03:23 PM2021-08-11T15:23:26+5:302021-08-11T15:24:27+5:30
Shiv Sena News: मुरबाडच्या सरळगांव येथे रविवारी या शिवसेनेच्या मेळाव्यात या कार्यकर्त्याना शिवबंधन बांधून त्यांना सेनेत प्रवेश दिला आहे. याचा फटका आता येथील सत्ताधारी भाजपाचे खासदार आणि आमदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या फळीला बसणार आहे.
ठाणे : राज्य सरकार व जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेत मुरबाड तालुक्यातील ४४ ग्राम पंचायतींपैकी ३३ ग्राम पंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि बहुतांशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते शिवबंधन रविवारच्या कार्यकर्ता मेळाव्यात बांधले, असा दावा ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केला आहे.
मुरबाडच्या सरळगांव येथे रविवारी या शिवसेनेच्या मेळाव्यात या कार्यकर्त्याना शिवबंधन बांधून त्यांना सेनेत प्रवेश दिला आहे. याचा फटका आता येथील सत्ताधारी भाजपाचे खासदार आणि आमदारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या फळीला बसणार आहे. कोविड आपत्तीच्या काळात शिवसेना सामान्यांसाठी धावली आहे, त्यामुळे आता माणसं जोडली जात आहे. शिवसेनेच्या शाखा वाढत असल्याचा दावा या मेळाव्यात पाटील, यांनी करुन बहुतांश कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार व शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांच्या नेतृत्वाखाली सरळगाव येथे हा शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य किसन गिरा, रेखाताई कंटे, पंचायत समितीचे सदस्य अनिल देसले, प्रकाश सुरोशे, पद्मा पवार, योगिता विशे, रामभाऊ दळवी, मोहन भावार्थे, शिवसेना जिल्हा संघटिका कला शिंदे, रश्मी निमसे, युवासेना अधिकारी प्रभुदास नाईक, उर्मिला लाटे, गुलाब भेरे ,महिला आघाडीच्या योगिता शिर्के, चंद्रकांत बोष्टे, रामभाऊ दुधाळे, प्रकाश पवार, संजय पवार, आप्प्पा घुडे, प्रशांत मोरे, पंकज दलाल, बाळू पष्टे आदींचा सक्रीय सहभाग होता.
या वेळी शिवसेनेच्या मुरबाड तालुका संघटकपदी योगिता शिर्के यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर महिला आघाडीतील विविध पदांवर ५० महिलांची नियुक्ती यावेळी केली. कोणतीही आपत्ती असो सर्वात आधी धावते, ती शिवसेना. कोविडबरोबरच नुकत्याच झालेल्या पूरआपत्तीतही शिवसेनेकडून सामान्यांना सर्वप्रथम दिलासा मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक सामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे आणि तो सदैव राहील. मुरबाड तालुक्याच्या विविध भागात शिवसेनेच्या या कार्याची प्रचिती येत असून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे, असे जि प. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील आदिवासी, वंचित घटकांबरोबरच शेतकरी व सामान्यांना न्याय मिळावा, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. सुचना दिल्या जात आहेत. कोविड आपत्तीच्या काळात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरसह विविध सुविधा दिल्या गेल्या. शिवळे येथे कोविड केअर केंद्र उघडण्यात आले. आरोग्य सुविधांबरोबरच जिल्हा परिषदेच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोकाभिमुख भूमिकेबरोबरच शिवसैनिकांच्या सक्रीयतेमुळे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. तालुक्यातील ४४ पैकी ३२ ग्रामपंचायती शिवसेनेच्या आहेत. त्यातून शिवसेनेवर ग्रामस्थांचा विश्वास बसला असल्याचे पवार यांनी सांगितले.