मला निवडणूक लढविण्यास कायद्याने मज्जाव नाही - साध्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 05:56 AM2019-04-24T05:56:20+5:302019-04-24T05:56:51+5:30
मी आरोपी असले तरी मलाही निवडणूक लढण्यास मनाई करता येणार नाही, अशी भूमिका भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील विशेष न्यायालयात मांडली.
मुंबई : फौजदारी खटल्यात आरोपी असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढण्यास कायद्याने मज्जाव नाही. त्यामुळे मी आरोपी असले तरी मलाही निवडणूक लढण्यास मनाई करता येणार नाही, अशी भूमिका भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील विशेष न्यायालयात मांडली.
विशेष ‘एनआयए’ न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पडाळकर यांच्यापुढे सध्या या बॉम्बस्फोटांत जखमींच्या साक्षी नोंदविणे सुरू आहे.
साध्वींना जामीन मंजूर करताना खटल्यास रोज हजर राहण्याची अट घालण्यात आली आहे. आपण खूप आजारी आहोत व कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय आपल्याला चालताही येत नाही, असे सांगून जामीन मिळविणाऱ्या साध्वी रणरणत्या उन्हात निवडणुकीचा प्रचार करत फिरायला मात्र तंदुरुस्त आहेत. शिवाय त्यांचा जामीन रद्द करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे साध्वींना निवडणूक प्रचार न करता न्यायालयात हजर राहण्यास सांगावे, असा अर्ज या बॉम्बस्फोटांमध्ये मृत्यू पावलेल्या सय्यद अजहर या तरुणाचे वडील निस्सार अहमद सय्यद बिलाल यांनी केला आहे.
याला उत्तर देताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी या अर्जात काही दम नसल्याने तो फेटाळावा, अशी मागणी केली. त्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार फौजदारी खटल्यात दोषी ठरून ज्यांना शिक्षा झाली आहे, अशा व्यक्तींनाच निवडणूक लढविण्यास मज्जाव आहे. प्रलंबित खटल्यातील आरोपींना बंदी नाही. त्यामुळे मीही केवळ आरोपी असल्याने मलाही निवडणूक लढविण्यापासून रोखता येणार नाही.
हा विषय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील असल्याने बिलाल यांच्या या अर्जावर आपल्याला काहीही म्हणणे मांडायचे नाही, असे या खटल्याचा अभियोग चालविणाºया राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले.
‘शिक्षा झाली नसल्याने निवडणुकीस पात्र’
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार फौजदारी खटल्यात दोषी ठरून ज्यांना शिक्षा झाली आहे, अशा व्यक्तींनाच निवडणूक लढविण्यास मज्जाव आहे. प्रलंबित खटल्यातील आरोपींना बंदी नाही. त्यामुळे मीही केवळ आरोपी असल्याने मलाही निवडणूक लढविण्यापासून रोखता येणार नाही, असा युक्तीवाद साध्वी यांनी न्यायालयासमोर केला