लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये; मी शिवसैनिक, शिवसेनेतच मरणार: संजय राऊत
By मोरेश्वर येरम | Published: December 29, 2020 12:31 PM2020-12-29T12:31:43+5:302020-12-29T12:33:29+5:30
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाहीत
मुंबई
"ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात. मात्र आम्ही शिवसैनिक आहोत. कुणालाही घाबरत नाही. शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार", असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. या नोटशीनंतर वर्षा राऊत आज ईडीच्या कार्यलयात चौकशीसाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्या आज चौकशीला जाणार नसून ईडीकडे दोन ते तीन दिवसांचा वेळ आम्ही मागितला आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
"ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करुन चालत नाही. कायद्यावर कुणाचाही दबाव असला तरी आम्ही कायदे मानतो. माझ्याकडे लपविण्यासारखं काहीच नाही. ईडीच्या नोटीशीला कायदेशीर उत्तर देखील देणार आहे. त्यासाठी वकीलांशी बोलून पुढील निर्णय घेणार असून दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे", असं संजय राऊत म्हणाले.
"मला धमकी देणारा जन्माला यायचांय"
"ईडीच्या नोटीशीने घाबरुन जाणाऱ्यातला मी नाही. माझ्याकडे लपविण्यासारखं काही नाही. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जाते. पण मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही", असा थेट इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिला.
पवईतील हॉटेलमध्ये राऊतांच्या गाठीभेटी
मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर संजय राऊत पवईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये गेले. याठिकाणी संजय राऊत यांनी कायदेशील सल्ल्यासाठी वकिलांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. पाऊण तासांच्या चर्चेनंतर संजय राऊत हॉटेलमधून बाहेर आले आणि त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.