इलक्सन आली, दिवाळी झाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:50 AM2019-04-15T00:50:10+5:302019-04-15T00:50:41+5:30
ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत
ठाणे : चलो इलक्सन आया है, ५०० रुपैय्या की बोली है’ असे म्हणत डोंबिवलीतील इंदिरानगर, त्रिमूर्तीनगर तसेच ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत. दिवसभरात टिकल्या, पापड करून जेवढी कमाई होत नाही, ती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या रॅली, सभा, भाषणांना गर्दी करून पाच तासांत मिळत असल्याने ‘इलक्सन के दिन है’ म्हणत अन्य कामांच्या ठिकाणी सुटी घेण्याची मानसिक तयारी महिलांनी केली आहे. बिर्याणी, चहा, नाश्ता, पाणी आणि येण्याजाण्यासाठी गाडीही असल्याने भाड्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जणू दिवाळीच आहे.
विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे पदाधिकारी किंवा ज्यांनी रॅलीमध्ये गर्दी, सभा भरवण्याची जबाबदारी घेतलेली असते, ते कॉर्पोरेट इव्हेंट करणाºया संस्थांचे प्रतिनिधी येतात आणि व्यवहार करून जातात. १०० ते ५०० महिला आणि त्यापुढे पुरुष, युवा अशी गर्दी दिसून येण्यासाठी वेगवेगळे बोलीचे प्रमाण ठरलेले आहे. अगदीच छोटा पक्ष असेल तर ३००, ४०० रुपये घेत महिला प्रचारात सहभागी होतात. परंतु, मोठ्या पक्षांकडून मात्र आणि ज्यांची चलती आहे, अशांकडून मात्र ५०० रुपये प्रति महिला, पुरुषांना देण्याची बोली पक्की झाल्याशिवाय कुणीही जात नाही. एकदा बोली झाली की, मग ती तारीख अन्य कुणालाही दिली जात नाही. तसेच बोली झाली की, लगेच सर्व निधी तोही रोखीच्या स्वरूपात द्यावा लागतो. संपर्कासाठी चार, पाच मोबाइल दिले जातात. ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी एकत्र येण्याचे ठिकाण, तेथे जाण्यासाठी वाहनांची सोय, पाण्यापासून चहा, नाश्ता, जेवणाचे पॅकेट्स असे सगळे ठरलेले असते, अशी माहिती रागिणी गौतम, संगीता जैस्वाल, रुबिना शेख, मुमताज शेख आदी महिला प्रतिनिधींनी दिली. या महिलांना गळ्यात घालायला उपरणे, टोप्या तसेच पक्षांचे झेंडे, निवडणूक चिन्हे हेही दिले जाते. प्रचारात सहभागी होत असल्याने रोजगार मिळतो. दिवस ढकलला जातो. महागाईच्या दिवसात कौटुंबिक खर्च भागवणे कठीण होते. त्यामुळे दिवस भरण्याची आणि अर्थार्जन करण्यासाठी जी संधी मिळते, ती न सोडण्याकडेच सगळ्यांचा कल असतो.
>भाडोत्री कार्यकर्त्यांना रोख मजुरी
धुणीभांडी करणाºया, वाहने धुण्यासाठी तसेच अन्य किरकोळ कामे करणाºया तळागाळातील महिला, पुरुषांचा वापर प्रचारात गर्दी करण्यासाठी केला जातो. या कामासाठी त्यांना मुख्यत्वे रोखीने पैसे मिळतात. त्यामुळे त्यांना नोटाबंदीच्या काळात बसलेला फटका भरून काढण्याची संधी निवडणुकीमुळे चालून आली आहे. बहुतांश उच्च मध्यमवर्गीयांसह सगळ्यांनाच धुणीभांडी करण्यासह वाहने धुण्यासाठी, सोसायट्यांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी मनुष्यबळ लागतेच. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ही कामे घरी केली जातात. त्यामुळे आता निवडणूक काळात हा कामगार वर्ग बरेचदा त्यांच्या कामावर नसल्याचे दिसते.तुमची कामवाली किंवा गाडी धुणारा दोन-चार दिवस दिसला नाही, तर त्याचा अर्थ तो या प्रचारफेरीत सामील झाला आहे. अलीकडे सभा, रॅलींचे इव्हेंट कंपन्यांना कंत्राट दिले जाते. त्यामुळे या व्यवसायातील छोट्या व्यापाऱ्यांवर संक्रांत आली आहे. साउंड सिस्टीम कालबाह्य झाली असून त्यासाठी केलेला खर्च अडकून पडला आहे.रिक्षांना झेंडे लावणे, हुडवर जाहिरात करणे, अशा पद्धतीनेही प्रचार केला जातो. अनेकदा पक्षप्रेमापोटी वाहनांवर झेंडे लावले जातात. पण, त्यातूनही दिवसाला १०० ते २०० रुपये मिळत असल्याने अथवा इंधन भरून दिले जात असल्याने ती संधी तरी का सोडावी, असा काही रिक्षाचालकांचा कल दिसून येतो.