"तेव्हा मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रिपद दान केलं," एकनाथ खडसेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 09:56 AM2020-11-09T09:56:14+5:302020-11-09T10:05:17+5:30
Eknath Khadse News : देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
जळगाव - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. तेव्हा मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, असे विधान खडसे यांनी मुक्ताईनगरमधील एका कार्यक्रमात केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला, असे खडसे म्हणाले.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही वर्षांपासून भाजपामध्ये नाराज होते. मंत्रिपद काढून घेतल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या नाराजीत भर पडली होती. दरम्यान, या नाराजीची पक्षाने दखल न घेतल्याने अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केल्यापासून एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे टीका करत आहेत. मी संपूर्ण जीवन पक्षासाठी खर्च केलं. एकनिष्ठ राहीलो. मात्र मला एका माणसानं छळलं, असा आरोपही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.