"मी आजवर असा 'रोड शो' पाहिला नाही"; प.बंगालमध्ये अमित शहांच्या 'रोड शो'ला तुफान गर्दी
By मोरेश्वर येरम | Published: December 20, 2020 04:59 PM2020-12-20T16:59:44+5:302020-12-20T17:01:43+5:30
बोलपूर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'रोड शो'ला तुफान गर्दी झाली आहे. "माझ्या आयुष्यात मी ...
बोलपूर
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'रोड शो'ला तुफान गर्दी झाली आहे. "माझ्या आयुष्यात मी आजवर असा 'रोड शो' अनुभवला नाही", असं अमित शहा यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा सध्या प.बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित शहा यांनी भाजप नेत्यांच्या बैठकीपासून ते निवडणुकीसाठीची रणनिती आणि प्रचाराचं काम केलं. प.बंगालच्या बोलपुर चौक ते डाक बंगलापर्यंत अमित शहा यांच्या 'रोड शो'चं आयोजन करण्यात आलं आहे. कोविडचं संकट असतानाही शहा यांच्या या 'रोड शो'ला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
"आजवर मी अनेक रोड शो केले आहेत. पण असा रोड शो मी आजवर माझ्या आयुष्यात पाहिला नाही. पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवंय याची साक्ष देणारी ही गर्दी आहे. जनतेनं आता यावेळी भाजपला विजयी करण्याचं मनात पक्क केलं आहे. ममता ब्रनर्जींच्या सरकारविरोधात प्रचंड राग येथील जनतेमध्ये पाहायला मिळतोय", असं अमित शहा म्हणाले.
West Bengal is yearning for change.
— Amit Shah (@AmitShah) December 20, 2020
Some glimpses from the ongoing road show in Bolpur. pic.twitter.com/tCVZZRR7Wd
प.बंगालच्या बीरभूममधील बोलपूर येथून अमित शहा यांच्या 'रोड शो'ला सुरुवात झाली आहे. बोलपूर ते हनुमान मंदिर आणि पुढे डाक बंगला येथे रोड शो संपणार आहे. अमित शहा यांच्या 'रोड शो'चं अंतर फक्त २ किमी आहे. पण भाजप समर्थकांनी तुफान गर्दी केल्यानं शहा यांचा ताफा अत्यंत धीम्यागतीने मार्गस्थ होत आहे. बोलपूरच्या रस्त्यावर यावेळी भाजपच्या समर्थकांनी तुडुंब गर्दी केली आहे. अमित शहा यांच्यासोबत कैलास विजयवर्गीय, दिलीप घोष आणि इतर भाजप नेते उपस्थित आहेत.