"मी दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार हटवू पाहतोय अन् विरोधक मला"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:52 AM2019-03-07T05:52:52+5:302019-03-07T05:53:06+5:30
मी दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार या गोष्टींना हटवू पाहत आहे आणि विरोधक मात्र मलाच हटवू पाहत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे लगावला.
कलबुर्गी : मी दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार या गोष्टींना हटवू पाहत आहे आणि विरोधक मात्र मलाच हटवू पाहत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे लगावला. ज्याला १२५ कोटी भारतीयांचे आशीर्वाद आहे असा माणूस त्याच्यासमोर हिंदुस्थानातील किंवा पाकिस्तानातील कोणीही असो, चोर असो वा अप्रामाणिक अशा लोकांना घाबरेलच कशाला? असाही सवाल त्यांनी केला.
पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उद््ध्वस्त केले. त्याबाबत जाहीर सभेत मोदी म्हणाले की, देशाने केलेली धाडसी कृती जगाने पाहिली आहे. ते श्रेय मोदी या व्यक्तीचे नसून साऱ्या देशाचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेली महाआघाडी प्रत्यक्षात महाभेसळ आघाडी आहे. जनतेला केंद्रात कणखर सरकार हवे आहे.
रायचूर येथे भारत पेट्रोलियमच्या डेपोचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते पार पडला. तिथे ते म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीस सहकार्य न देऊन कुमारस्वामी सरकार कर्नाटकमधील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. राज्य सरकारने अडथळे आणायचे प्रयत्न केल्यास शेतकरीच सरकारला दूर करतील. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी सरकार दुबळे असून त्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हाती आहे.
५६ आकडा ऐकून
छातीत धडकी भरते
कांचीपुरम : येथील कार्यक्रमात मोदी म्हणाले की, नुसता ५६ हा आकडा ऐकला तरी काँग्रेसच्या छातीत धडकी भरते. आम्ही जी कामे करून दाखवली, त्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. ती विरोधकांकडे नाही. त्यावेळेपासून देशाच्या राजकारणामध्ये मोदींवर टीका करताना ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख होऊ लागला. (वृत्तसंस्था)