मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर

By मोरेश्वर येरम | Published: December 1, 2020 05:07 PM2020-12-01T17:07:49+5:302020-12-01T17:17:27+5:30

उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.

I was born a Hindu my religion is Hindu Urmila Matondkars reply to trolls | मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर

मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर

Next
ठळक मुद्देशिवसैनिक म्हणून आले, शिवसैनिक म्हणून काम करणार: उर्मिला मातोंडकरबॉलिवूड हे मुंबईच्या रक्तात असल्याचं केलं विधानमी मराठी असून पाऊल पुढे टाकल्यानंतर मागे हटत नाही; उर्मिला यांचा विरोधकांना इशारा

मुंबई
सेक्युलर याचा अर्थ धर्माचा तिरस्कार करणे असा होत नाही. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. हिंदू धर्माचा मी अभ्यास केला आहे. त्यामुळे वेळ आल्यावर मी धर्मानुसारच वागेन, असं वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत उर्मिला यांनी अनेक प्रश्नांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. त्यांना विचारसरणीबद्दल विचारलं असता उर्मिला यांनी आपण जन्माने आणि कर्माने हिंदू असल्याचं ठामपणे सांगितलं. "सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे. हिंदू हा सर्वात सहिष्णू धर्म आहे. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी आजवर हिंदू धर्माचा बराच अभ्यास केला आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मी योगसाधना केली आहे. देव हा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो. त्याप्रमाणेच धर्म हा मनातला आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याविषयी जाहीरपणे बोलण्याची मला गरज वाटत नाही. पण मी गरज पडेल तेव्हा धर्मानुसारच वागेन", असं ठाम मत उर्मिला यांनी व्यक्त केलं.

ट्रोलर्स हे माझ्यासाठी पदक
''ट्रोलर्सचं मी स्वागत करते. ट्रोल म्हणजे मी पदक मानते. ट्रोलर्स मला नेहमी दाखवून देतात की मी योग्य मार्गावर आहे. मी मराठी आहे पाऊल पुढे टाकल्यानंतर मागे घेणार नाही'', असं उर्मिला यावेळी म्हणाल्या. 

काँग्रेसला 'रामराम' करुन १४ महिने झाले
"काँग्रेस पक्ष सोडताना मी राजकारण सोडेन असं म्हटलं नव्हतं. काँग्रेस सोडून मला १४ महिने झाले. त्यामुळे तो विषय आता जूना झाला आहे. कोणत्याही पदासाठी मी पक्ष बदलणाऱ्यातली नाही. मला काम करण्याची संधी शिवसेनेत दिसली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला", असं उर्मिला यांनी सांगितलं. 

महाविकास आघाडीच्या कामाचंही उर्मिला यांनी यावेळी कौतुक केलं. "गेल्या एका वर्षात महाविकास आघाडी सरकारचं काम खूप चांगलं राहिलं आहे. उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला मुख्यमंत्री नाही, तर कुटुंबप्रमुख म्हणून सांभाळून घेताना सर्वांना पाहायला मिळाले. त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलंय आणि त्यांच्या नेतृत्वात काम करायला मला आवडेल. शिवसेनेची महिला आघाडी खूप भक्कम आहे. त्यांचा भाग होण्याची संधी मला मिळाली यासाठी मी आभारी आहे. मी शिवसैनिक म्हणूल आले आणि शिवसैनिक म्हणूनच काम करेन'', असं उर्मिला म्हणाल्या.

मुंबईच्या रक्तात बॉलिवूड
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरही उर्मिला यांनी आपलं मत व्यक्त केलं. "योगी आदित्यनाथ मुंबईत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांना जय महाराष्ट्र सांगू शकता'', असं उर्मिला म्हणाल्या. बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलविण्याचा योगी आदित्यानाथ यांचा विचार असल्याच्या वृत्तावर बोलताना उर्मिला यांनी 'बॉलिवूड हे मुंबईच्या रक्तात आहे. ते असं सहज दूर होऊ शकेल असं वाटतं नाही', असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा विचार आवडला
''उद्धवजींचा मला फोन आला. त्यांनी माझ्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे बातचित केली. विधानपरिषदेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा समृद्ध आहे, तो वारसा वाढवण्यासाठी आपण यावं, हा उद्धव ठाकरेंचा विचार मला आवडला'', असं उर्मिला यांनी सांगितलं.

Web Title: I was born a Hindu my religion is Hindu Urmila Matondkars reply to trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.