नाशकात गुन्हेगारी वाढत असेल तर गुंतवणूक येणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2023 01:05 AM2023-01-22T01:05:26+5:302023-01-22T01:09:29+5:30

दावोसला मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ गेले होते आणि कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. यात नाशिकच्या पदरी भोपळा पडला. राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा आपण नाशिककरांनी गुंतवणूकदार नाशिकमध्ये का येत नाही, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. २१ लाखांच्या या शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. हवामान आल्हाददायक आहे.

If crime is increasing in Nashak, how will the investment come? | नाशकात गुन्हेगारी वाढत असेल तर गुंतवणूक येणार कशी?

नाशकात गुन्हेगारी वाढत असेल तर गुंतवणूक येणार कशी?

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिस स्टेशनबाहेर फटाके फोडले जाताततब्बल ८ तास शेतकरी मालेगावात ठिय्या मांडूनराजकीय व शासकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता

बेरीज वजाबाकी

मिलिंद कुलकर्णी

दावोसला मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ गेले होते आणि कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. यात नाशिकच्या पदरी भोपळा पडला. राजकीय आरोप-प्रत्यारोपापेक्षा आपण नाशिककरांनी गुंतवणूकदार नाशिकमध्ये का येत नाही, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. २१ लाखांच्या या शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. हवामान आल्हाददायक आहे. सुवर्ण त्रिकोणात शहर आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवत आणि पायाभूत सुविधांचा विचार न करता ज्या गती आणि पद्धतीने विकास केला जात आहे, तो पुढे गंभीर विषय बनणार आहे. अपघात, प्रदूषण या दोन्ही बाबींमध्ये नाशिकचे नाव अग्रक्रमावर आहे. गुन्हेगारीवर कुणाचा अंकुश आहे की, नाही असे वाटावे एवढी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. विधिमंडळात एका पोलिस निरीक्षकाविरोधात चर्चा होते, महिन्यानंतर त्यांची चौकशी सुरू होते, बदली होते आणि पोलिस स्टेशनबाहेर फटाके फोडले जातात, हे चित्र काय दर्शवते? पोलिस दलातील अनागोंदी तर नव्हे ना?

बळीराजाच्या शक्तीचे दर्शन

जिल्हा बँकेच्या शेतकरी विरोधी कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोर्चातून बळिराजाच्या शक्तीचे दर्शन घडले. शरद जोशी यांची शेतकरी संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह इतर शेतकरी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांची बँक असलेली जिल्हा बँक आता शेतकऱ्यांचे हित साधण्यापेक्षा शेतकऱ्यांचे तथाकथित नेते असलेल्या राजकीय मंडळींना सांभाळण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. या मोर्चातून तो दिसून आला. तब्बल ८ तास शेतकरी मालेगावात ठिय्या मांडून बसले होते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी संवेदनशीलता दाखवित मोर्चापूर्वी आदल्या रात्री आणि मोर्चातही शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. सहकारमंत्र्यांशी चर्चा करीत काही आश्वासने मिळविली. मुद्दल कर्जाच्या रकमेवर सहा ते आठ टक्के व्याज आकारणी करून भरपाई देण्यास मुदतवाढ देऊ, सक्तीची कर्जवसुली थांबवू, अशी आश्वासने पदरी पडली. ही पाळली न गेल्यास १६ फेब्रुवारीला शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार आहेत.

आधी लॉजिस्टिक पार्क करा, नंतर श्रेय घ्या

निफाड साखर कारखान्याच्या अतिरिक्त जागेवर ड्रायपोर्ट होणार होता, तो का झाला नाही, याचा मोठा इतिहास आहे. त्या वादात न पडता ताजा विषय म्हणजे ड्रायपोर्टऐवजी आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क होणार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंटचे सीईओ प्रकाश गौर आणि त्यांचे पथक येऊन गेले. त्यांनी जागेची पाहणी केली. लगतच्या सुकेणे रेल्वे स्टेशनला भेट दिली. अवघ्या ८ कि.मी. अंतरावर असलेल्या महामार्गावरदेखील ते जाऊन आले. ११० एकर जागेत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गे जोडण्यासाठी आता सुधारित डीपीआर केला जाणार असल्याची माहिती या पथकाने दिली. या प्रकल्पासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या पाठपुरावा करीत आहे. मात्र त्या दक्षिण भारतात दौऱ्यावर असताना हे पथक आले आणि खासदार हेमंत गोडसे यांनी पथकासोबत जात पाहणी केली. त्यावरून श्रेयाच्या चर्चा रंगल्या. निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर यांनी या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांची जंत्री सादर केली.

आदर्श आचारसंहितेची व्यवहार्यता तपासा

राज्यातील पाच ठिकाणी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत. सर्वच महसूल विभागात त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोणत्याही नवीन विकासकामांना मंजुरी मिळणार नाही, निविदा, कार्यादेश निघणार नाही, प्रारंभ होणार नाही, असे या आचारसंहितेचे स्वरूप आहे. मुळात शिक्षक व पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक असल्याने दोन लाखांपर्यंत मतदारांशी या निवडणुकीचा संबंध आहे. सर्वसामान्य मतदारांना या निवडणुकीचे सोयरसुतक नाही; पण आचारसंहिता संपूर्ण पाच जिल्ह्यांमध्ये लागू आहे. आधीच कोरोनामुळे दोन वर्षे विकासकामे ठप्प होती. यापुढे पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका येतील. म्हणजे सर्वकाळ आचारसंहिता राहील, अशीच चिन्हे आहेत. शेषन यांच्यासारख्या निवडणूक आयुक्तांची अशा वेळी आठवण येते. नियमांची व्यवहार्यता तर तपासायला काय हरकत आहे?

वादाला आले नळावरच्या भांडणाचे स्वरूप

देवळालीच्या आमदार सरोज आहेर आणि तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्याला अक्षरश: नळावरील भांडणाचे स्वरूप आले आहे. तहसीलदार राजश्री अहिरराव व त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता अलका अहिरराव या दोघांविषयी आमदार सरोज आहेर यांचा आक्षेप आहे. देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तहसीलदार राजश्री अहिरराव या इच्छुक असून त्या शासकीय पदाचा उपयोग करीत मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवितात, तर भगिनी अलका अहिरराव या आमदारांच्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम करीत असल्याचा आमदार सरोज आहेर यांचा आक्षेप आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात तसेच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी अहिरराव भगिनींवर जाहीर आरोप केले आहेत. अहिरराव भगिनींनी त्या आरोपांना उत्तर दिले नसले तरी राजश्री अहिरराव या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करीत भूमिका मांडत आहेत. हे भांडण थांबविण्यासाठी राजकीय व शासकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

Web Title: If crime is increasing in Nashak, how will the investment come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक