कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु – शिवसेना खा. संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 10:40 AM2020-09-06T10:40:06+5:302020-09-06T10:42:15+5:30
राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणौत हिच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीच दिली होती.
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. कंगनानं मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केलेल्या तुलनेमुळे शिवसेना भडकली, हा मुंबईचा अपमान आहे असं सांगत शिवसेनेने कंगनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मात्र कंगनानेही मागे न हटता शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले. यावरुन हा वाद आणखी पेटला.
राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणौत हिच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीच दिली. या संपूर्ण प्रकरणावर आता पुन्हा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
If that girl (Actor Kangana Ranaut) will apologise to Maharashtra, then I will think about it (of apologising). She calls Mumbai a mini Pakistan. Does she have the courage to say the same about Ahmedabad?: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/GnUBd0ZTFO
— ANI (@ANI) September 6, 2020
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा
कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता.
कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते.
अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला
'आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताने कंगना राणौत हिची पाठराखण केली आहे.