...तर मंत्री जयंत पाटील आज भाजपत असते, नारायण राणेंचा खळबळजनक दावा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 30, 2020 09:54 PM2020-11-30T21:54:23+5:302020-11-30T21:56:14+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे.
रत्नागिरी - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नसते, तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे.
पत्रकारांशी बोलताना एका प्रश्नावर राणे म्हणाले, जयंत पाटील या आणि पुढची पाच वर्षेही आपणच मंत्री असू, असं म्हणाले असतील. कारण, आता भाजपचे सरकार असते तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारीही त्यांनी दर्शवली होती. एढेच नाही, तर भाजपमध्ये येण्यासंदर्भात त्यांची बोलणीही भाजपच्या नेत्यांशी झाली होती. काही गोष्टींसाठी ते थांबले होते. अन्यथा ते आज भाजपमध्ये असते, असा दावा राणे यांनी केला आहे. याच बरोबर जयंत पाटील हे माझ्यासंदर्भातही बोलले आहेत. मात्र, मी त्यांचा समाचार इस्लामपुरात जाऊन घेईन, असा इशाराही राणे यांनी पाटलांना दिला आहे.
अपयशी सरकार -
यावेळी महाविकास आघाडीवर बोलताना राणे म्हणाले, सरकार या वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सरकारने जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? असा सवालही राणे यांनी यावेळी केला. तसेच, राज्यात केवळ दडपशाही सुरू आहे. सुशांतचा खून झाला. मात्र, मंत्र्यांना वाचविण्यासाठी, ती आत्महत्या असल्याचे हे सरकार दाखवत आहे, असा गंभीर आरोपही राणे यांनी राज्य सरकारवर केला यावेळी केला.
कोरोनाच्या नावाखाली ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार-नारायण राणे -
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपल्या सरकारने वर्षपूर्ती केल्याची मुलाखत देताना त्यांनी वर्षभरात सरकारने काय ठोस केले, याची माहितीही देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी काही केलेलेच नाही. कोरोनावरील उपाययोजनांसाठी सरकारने १२ हजार कोटी खर्च केल्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्यातील असंख्य कामे आपल्याच नातेवाईकांना देऊन सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
हक्काचे 16 टक्के आरक्षण हवे -
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना राणे म्हणाले, आम्हाला कोणतीही तडजोड नको. कुणाच्या वाट्याचेही आरक्षण नको. आम्हाला केवळ आमच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण हवे आहे. असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.