“हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं”; किरीट सोमय्यांचं शिवसेनेला खुलं चॅलेंज
By प्रविण मरगळे | Published: November 13, 2020 12:40 PM2020-11-13T12:40:25+5:302020-11-13T12:45:20+5:30
BJP Kirit Somaiya, Shiv Sena, CM Uddhav Thackeray News: आतापर्यंत रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेले ४० जमीन व्यवहार झालेत त्यातील ३० व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत झाली असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.
मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे, संजय राऊत यांनी सोमय्या यांना दिलेल्या आव्हानाला त्यांनी प्रतिआव्हान दिलं आहे. मुंबईच्या एसआरए गाळ्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार आणि एसआरएविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवाळीनंतर या जनहित याचिकेवर सुनावणी होईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मुंबईच्या भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने २ कोटी ५५ लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे. मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी याबाबत मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी सुमोटो अधिकारातंर्गत तपास करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत. दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार हे आश्वासन दिले होते, ते मी पाळले. यावर संजय राऊत काहीही बोलायला तयार नाहीत. या व्यवहारांवर हिंमत असेल तर शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी भाष्य करावे असं त्यांनी सांगितले.
तसेच अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? आणखी ९ सातबारा देणार आहे, ३० जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आतापर्यंत रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेले ४० जमीन व्यवहार झालेत त्यातील ३० व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत झाली, या सातबाऱ्यावर ही जमीन लागवडीसाठी योग्य नाही असं लिहिलंय, शिवसेनेत हिंमत नाही म्हणून यावर बोलणार नाही, माझ्या ५ प्रश्नांची उत्तर द्या. नाईक कुटुंबांशी ठाकरे संबंधित आर्थिक संबंध काय? हे महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचं आहे. हे सांगावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत उत्तर द्यावं, जमीन कशासाठी घेतली? रवींद वायकरांसोबत आर्थिक भागीदारी आहे का? या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत नाही असा टोला किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला.
तसेच एसआरए गाळे हडपले तरीही महापौरांवर कारवाई का केली नाही? ५ मराठी झोपडपट्टीवासियांचे गाळे किशोरी पेडणेकर यांनी ढापले, हे दिसत नाही का? मूळ प्रकरणाला बगल देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न करत आहे. मी पोलिसांपासून सगळीकडे तक्रारी केल्या आहेत, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, दिवाळीनंतर यावर सुनावणी होईल, माझे आरोप खोटे असतील तर तक्रार करा, शिवसेनेत हिंमत नाही मला हात लावून दाखवावं, पुरावे चुकीचे असतील तर जेलमध्ये जाण्याची तयारी आहे असं किरीट सोमय्या यांनी सांगितले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय देण्याची भूमिका शिवसेनेची आहे. ज्यांच्यामुळे ही आत्महत्या झाली त्यांच्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न शेठजींच्या पक्षाकडून होत आहे. सोमय्या गिधाडासारखे कागद फडकवतायेत..कायद्याच्या चौकटीत राहून केलेले व्यवहार आहेत. रोज सकाळी आरशात पाहून भ्रष्टाचार भ्रष्टाचार किंचाळत असतील, नैराश्य आणि वैफल्यग्रस्त आहेत. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. सोमय्यांना काहीही माहिती नाही, फालतू माणूस आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया मांडली.
दरम्यान, खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगू शकत नाही, मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेले, त्या स्वत: आणि त्यांची कन्या न्यायासाठी आक्रोश करतायेत, अर्णब गोस्वामी तुमचा लागतो कोण? नाईक कुटुंब मराठी आहेत, ते तुमचे कोणी लागत नाहीत का? महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. हे सगळे भंपक, बनावट लोक आहेत, महाराष्ट्राच्या मूळावर उठणारे हे लोक आहेत म्हणून त्यांना घरी बसवलं आहे. जे गुंडाची बाजू घेतायेत त्यांना ५ वर्ष नाही तर २५ वर्ष घरी बसवू, स्वत: भ्रष्टाचारी आहेत दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेत आहेत. ईडी तुमच्या बापाची नोकर आहेत का? असा सवालही संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे.