आंदोलन करायचेच आहे तर कोरोना विरुद्ध करा; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 08:25 PM2021-08-10T20:25:23+5:302021-08-10T20:25:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - आंदोलन करायचे आहे तर कोरोना विरुद्ध करा. कोरोना मुक्त गाव असे आंदोलन करा. प्रत्येकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - आंदोलन करायचे आहे तर कोरोना विरुद्ध करा. कोरोना मुक्त गाव असे आंदोलन करा. प्रत्येकाने आपले गाव कोरोना मुक्त करायला घेतले तर राज्य कोरोना मुक्त होईल. याचा आदर्श घेऊन देश कोरोना मुक्त होईल. स्पर्धा - आंदोलने करायची असेल तर आरोग्य सेवा सुविधे साठी करा. जास्तीजास्त ऑक्सिजन प्लांट लावून देतो असे आंदोलन करा. कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही आहे, कि मोफत कोरोना वाटप कार्यक्रम, अश्या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला.
मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातुन त्यांच्या कार्यालयात खासगी 'ऑक्सिजन प्लांट' उभारला आहे. त्याचे ऑनलाईन लोकार्पण आज मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा नगरसेविका परीशा सरनाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट मधून नागरिकांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, विरोधी पक्षनेता प्रविण पाटील, गटनेता निलम ढवण, नगरसेविका भावना भोईर, शर्मिला बगाजी, संध्या पाटील, वंदना पाटील, तारा घरत, स्नेहा पांडे, कुसुम गुप्ता, अर्चना कदम, नगरसेवक अनंत शिर्के, जयंतीलाल पाटील, कमलेश भोईर, सह हे सर्व नगरसेक उपस्थित होतेजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, १४५ विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रतापसिंह , उपजिल्हाप्रमुख राजू भोईर, शंकर वीरकर व संदीप पाटील, उपजिल्हासंघटक निशा नार्वेकर, सुप्रिया घोसाळकर, जयलक्ष्मी सावंत , शहरप्रमुख लक्ष्मन जंगम, प्रशांत पालांडे, सचिन मांजरेकर, प्रवक्ता शैलेश पांडे आदी सह शिवसैनिक उपस्थित होते . आमदार गीता जैन मात्र उपस्थित नसल्याने सरनाईक - जैन यांच्यातील मतभेद चर्चेत आले आहेत .
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कि , कोरोनाची लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले याची जाण व भान विरोधकांना नाही. आता दुसरी लाट ओसरल्या नंतर ते अमुक करा नाही तर आंदोलन करू, तमुक करा नाहीतर आंदोलन करू आणि पुन्हा लाट आली कि सरकारच्या डोक्यावर बसू हे जे काही राजकारण चालले आहे . अरे आंदोलने कसली करताय असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
मिशन ऑक्सिजन पूर्ण करण्यासाठी कदाचित वर्ष - दोन वर्ष लागतील . आता तातडीने ऑक्सिजनची आवश्यकता नसली तरी पुढील लाटेच्या अनुषंगाने त्याची तयारी हवी . लस, रेमेडिसिवीर केंद्राने ताब्यात घेतले . केंद्रा कडून मिळतेय, मी काही टीका करणार नाही . पण केंद्राच्या जश्या मर्यादा आहे तश्या राज्याच्या मर्यादा आहेत . कोरोना काळात नाशिकला पोलीस अकादमी चे काम पूर्ण झाले . माझ्या हस्ते भूमिपूजन व आता त्याचे उदघाटन झाले . कमी वेळात दर्जेदार काम सरकारने केले. कामे होत आहेत , ती थांबली नाहीत पण मंदावली आहेत . मोठा निधी आरोग्यावर खर्च होत आहे . त्यात चक्रीवादळ , पूर , अतिवृष्टी चे संकट आले . पण अश्या स्थितीत सुद्धा सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले .
काही करंटे लोक सरनाईक यांच्या मागे लागले असताना त्यांनी न डचमळता शिवसेनेनेचा समाजसेवेचा वसा धरून काम करत आहेत . कितीही संकट आले तरी शिवसैनिक मर्दासारखा लढतो आणि जनतेची कामे करत राहतो. चांगले काम करणाऱ्याचे लक्ष विचलित करण्याचा घाणेरडा प्रकार सुरु आहे . राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी सरनाईक कडून धडा घ्यावा व कामाने स्पर्धा करून दाखवावी. असे मुख्यमंत्र्यांनी सरनाईक व कुटुंबियां मागे ईडीचा ससेमिरा लावणाऱ्यांना सुनावले .
सरनाईक यांनी शहर विकासकामांच्या विविध मागण्या आपल्या भाषणात सांगितल्या . त्यावर मुख्यमंत्र्यांनी, मागण्यांच्या वेळेस स्पीच कट झाले . ऐकू आले नाही असे सांगताच सरनाईक यांनी आपण अंतर्यामी आहेत असे म्हटले . त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकनाथजी, प्रताप चांगले काम करतोय. कुठे कट मारू नका असे सांगताच शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून मुख्यमंत्र्यांना दाद दिली . ठाण्याच्या राजकारणात शिंदे व सरनाईक यांच्यातील अंतर्गत वाद हा चर्चेचा विषय असतो . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना उघडपणे दिलेली समज आहे का ? अशी चर्चा सेनेसह राजकीय वर्तुळात रंगली आहे .
कोरोना काळात शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमीगावकर सह शहरातील २३ शिवसेना पदाधिकारी - शिवसैनिकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला . त्यातील १८ कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सहाय्य आ. सरनाईक यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले . तर ५ कुटुंबीयांनी आर्थिक स्थिती चांगली असल्याने मदत स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले .