नारायण राणेंच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केलेले; खासदार संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:58 AM2021-08-27T11:58:09+5:302021-08-27T11:58:39+5:30
‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचे भान ठेवायला हवे. महाराष्ट्रात आल्यापासून ते घाणेरड्या भाषेत मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. कोण कुठला मुख्यमंत्री, गेला उडत अशी त्यांची विधाने होती. सुडाची कारवाई करायची असती तर १५ दिवसांपूर्वीच केली असती. त्यामुळे त्यांच्यावर आता झालेली कारवाई कायदेशीरच असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत राऊत म्हणाले की, राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही. १५ दिवसांपूर्वीच्या विधानांवर त्यांच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केले. केंद्रीय मंत्री म्हणून आदर ठेवला. गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासातच नव्हे तर २४ मिनिटे किंवा २४ सेकंदातही अटक होते. गुन्हेगारांना संधी दिल्यास तो पळून जातो, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
राणे यांच्या कारवाई दरम्यान मंत्री अनिल परब यांच्या भूमिकेचेही राऊत यांनी समर्थन केले. परब हे सरकारमधील मंत्री आहेत. ज्या भागात राणेंना अटक केली तिथले पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला त्यात गैर काय असा प्रश्न करतानाच ज्यांची वकिली चालत नाही ते राजकीय सल्ले देत बसतात, अशा शब्दांत राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना सुनावले.
‘मी नेहमी पक्षप्रमुखांना वरचढ मानतो
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये नेमके कोण वरचढ दिसते, या प्रश्नावर ‘मी नेहमी पक्षप्रमुखांना वरचढ मानतो. ते मुख्यमंत्री आहेत हा योगायोग आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हे आजही सर्वोच्च पद आहे, असे राऊत म्हणाले.
तरूण पिढीने नेतृत्व करायला हवे
मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे दिले जाणार असल्याबाबतच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, तरूण पिढीने नेतृत्व करायला हवे असेच आम्हाला वाटते. आमच्याशिवाय पक्षात कुणी नाही या भूमिकेत आम्ही कधीच नसतो. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व या महानगरपालिका निवडणुकीत लाभले तर माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट ठरेल. त्यांचं नेतृत्व झळाळून निघाले तर सगळ्यात जास्त आनंदी मी असेन, असे सांगतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
राणे यांनी आपल्या खात्याचा कारभार योग्यपणे सांभाळावा. राणेंना शिवसेनेचा प्रभार दिला नाही. शिवसेनेवर चिखलफेक करणे हे तुमचे काम नाही. १५ दिवसांपूर्वीच्या विधानांवर त्यांच्या स्वभावाला औषध नाही म्हणून दुर्लक्ष केले. केंद्रीय मंत्री म्हणून आदर ठेवला.
- संजय राऊत, शिवसेना खासदार