“मी नक्कीच स्वत: ७ वेळा निवडून येईन याची खात्री”; भाजपा आमदाराचा एकनाथ खडसेंवर निशाणा
By प्रविण मरगळे | Published: November 18, 2020 01:13 PM2020-11-18T13:13:00+5:302020-11-18T13:14:27+5:30
NCP Eknath Khadse, BJP Eknath Khadse News: एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं.
मुंबई – राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. मी ६ वेळा जनतेतून निवडून आलोय, प्रसाद लाड यांनी एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावं असा टोला एकनाथ खडसेंनी प्रसाद लाड यांना लगावला होता. त्यावर आता आमदार प्रसाद लाड यांनीही एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत आमदार प्रसाद लाड म्हणाले की, आजवरच्या राजकारणात भाजपा संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला. ज्या पक्षाने एवढं दिलं, अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत अशी टीका त्यांनी एकनाथ खडसेंवर केली.
आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं,अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली,तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत.@EknathGKhadse
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 18, 2020
त्याचसोबत स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे असा टोलाही आमदार प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.
स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?
— Prasad Lad (@PrasadLadInd) November 18, 2020
मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहें! @EknathGKhadse@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@MiLOKMAT@mataonline@LoksattaLive
काय आहे वाद?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, या दौऱ्याच्या निमित्ताने पत्रकारांनी प्रसाद लाड यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, परंतु आता त्यांचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ खडसेंची तडफड सुरु आहे. पण त्यांनीही काहीही केलं तरी भाजपा कमजोर नाही, आम्ही सक्षम आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. एकनाथ खडसेंना डोक्यावर घेऊन देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम महाविकास आघाडी करतंय असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं. शरद पवार हे मोठे नेते आहेत, ५० वर्ष शरद पवार राजकीय दौरे करत आहे, राजकीय दौरे हा त्यांचा आवडीचा विषय आहे, परंतु एकनाथ खडसेंसाठी दौरा केल्याने भाजपाला फटका बसेल असं अजिबात नाही असंही प्रसाद लाड यांनी सांगितले होतं.
त्यावर एकनाथ खडसेंनी प्रसाद लाड यांनी जनतेतून एकदा निवडून येऊन दाखवावं, मी जनतेतून ६ वेळा सलग निवडून आलो आहे असं आव्हान दिलं होतं. शरद पवार येत्या २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु शरद पवारांचा दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे.