मनसेची मंगळवारी महत्वाची बैठक; पालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 07:43 AM2021-01-09T07:43:00+5:302021-01-09T07:43:35+5:30
MNS News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. लवकरच राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तर, वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृष्णकुंजवरील बैठकांचे सत्र आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेली विविध आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. आपापल्या भागातील राजकीय स्थिती मांडण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. लवकरच राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तर, वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात मनसेनेही संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या काही काळापासून कृष्णकुंजवर पक्षाच्या विविध आघाड्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. आता मंगळवारी मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, त्यासाठी पक्ष संघटनेची सद्य:स्थिती, तयारी, राजकीय-सामाजिक समीकरणे आदींबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शिवाय, आगामी काळात स्थानिक कार्यकर्त्यांना पदे आणि जबाबदाऱ्या देण्याबाबतही चाचपणी सुरू आहे.
कोरोनाकाळात आपल्या मागण्यांसाठी विविध शिष्टमंडळे ‘कृष्णकुंज’वर धाव घेत होती. डाॅक्टरांपासून पालक, विद्यार्थी, मुंबईतील डबेवाले, मत्स्यविक्रेते, जीममालक-चालक अशा विविध घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज यांनीही विजेसह अन्य प्रश्नांवर कधी राज्यपालांची भेट घे, तर कधी संबंधित खात्याच्या मंत्र्याशी बोलणे करत विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. या सर्वांचा उपयोग निवडणुकीत व्हायचा असेल तर संघटनात्मक बांधणी व नियोजनबद्ध कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मंगळवारची पदाधिकाऱ्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.