Nawab Malik: 'मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान', नवाब मलिकांकडून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:43 AM2021-08-24T09:43:31+5:302021-08-24T09:47:11+5:30
Nawab Malik: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे.
Nawab Malik: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे. नाशिकमध्ये राणेंविरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून त्यांच्या अटकेचे आदेश निघाले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणं म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी वागत असेल तर कारवाई झालीच पाहिजे", असा आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नारायण राणे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.
नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. आज चिपळूणमध्ये त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल. तिथेच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
काय होतं राणेंचं वादग्रस्त विधान?
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.