"इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही"; गणेश नाईकांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 08:56 PM2021-02-11T20:56:24+5:302021-02-11T20:57:19+5:30
Navi Mumbai Election Politics : नवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या तोंडावर शिवसेनेने भाजपात गेलेल्या नाईक गटाचे नगरसेवक फोडल्याने गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागले आहे. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक खळबळजनक वक्तव्य केले आहे. (Ganesh Naik gave warning to Shivsena before Navi mumbai municipal Election)
इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही, असे नाईक म्हणाले. .यावर शिवसेनेने देखील लगेचच प्रत्यूत्तर दिले असून गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत, असे शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटले आहे. यावरून नवी मुंबईतील पालिका निवडणूक किती चुरशीची होणार आहे हे दिसू लागले आहे.
तुर्भेमधील भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असे गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
नाईक गटाला गळती
नवी मुंबई महानगर पालिकेत तीन पक्षांनी आघाडी झाल्यास त्यांच्यासमोर निवडून येणे कठीण जाणार असल्याने भाजपाच्या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नगरसेवकांची गळती सुरू झाली आहे. गणेश नाईक समर्थक असलेल्या 14 नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेत 11 तर राष्ट्रवादीमध्ये 3 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. यावर नाईकांनी आपण शिवसेनेचे दुप्पट नगरसेवक फोडणार असल्याचा इशारा दिला होता.